भाजपवर नाराज करणी सेनेनं दिला अपक्ष उमेदवार, आनंदसिंग ठोके यांचा उमेदवारी अर्ज दाखल
धुळे : गुजरात राज्यात भाजपच्या एका नेत्याने राजपूत समाजाबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षावर कमालीच्या नाराज असलेल्या करणी सेनेनं आणि राजपूत समाजानं एक अपक्ष उमेदवार दिला आहे. या उमेदवारानं धुळे लोकसभा मतदारसंघातून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करीत भाजपच्या उमेदवाराला आव्हान दिलं आहे. आनंदसिंग ठोके असं या उमेदवाराचं नाव असून, सत्ताधाऱ्यांबद्दल त्यांच्या भावना तीव्र आहेत.
धुळे लोकसभा मतदारसंघातून करणी सेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आनंदसिंग ठोके यांनी मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी त्यांच्या समवेत प्रवीण ठोके, शेखर पगार, कमलेश पगार, नंदराज सूर्यवंशी, महिला अध्यक्षा अनिताताई गिरासे, करणी सेना युवा अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र जयदीप जाधव, वकील राजपूत उपस्थित होते.
याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना आनंदसिंग ठोके यांनी आपली भूमिका मांडली. धुळे लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत; ज्या आतापर्यंत विद्यमान खासदारांनी दहा वर्षात सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. रेल्वे, पाणी, रस्ते इत्यादी प्रश्नांवर लोकांना वंचित ठेवले. विद्यमान खासदारांनी प्रत्यक्षात विकासकामे केली नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार संसदेत कधी बोलले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी माझी उमेदवारी आहे. शेतकरी वर्गाने त्याचप्रमाणे या संघटनेसह इतर अनेक संघटनांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला असून, प्रचारासाठी सर्वांचं सहकार्य लाभत आहे. शेतकऱ्यांवर निर्यातबंदीसारखे निर्णय लादले जात आहेत. बळीराजासाठी राजकीय पक्ष कामे करताना दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार यांनी देखील याप्रसंगी बोलताना विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे व महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीवर टीका केली. या दोन्ही उमेदवारांचा मतदारसंघात फारसा संपर्क नाही. त्यामुळे स्थानिक उमेदवार आनंदसिंग ठोके यांच्या पाठीशी शेतकरी वर्ग ठामपणे उभा असून, त्यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
हेही वाचा