वंचित बहुजन आघाडीचे शक्तीप्रदर्शन
धुळे : वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आयपीएस अधिकारी अब्दुर रेहमान यांनी शुक्रवारी प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे लोकसभा मतदारसंघातून अब्दुर रेहमान यांचा उमेदवारी अर्ज 3 मे रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे दाखल करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, जिल्हा संघटक शंकर खरात यांच्यासह इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
अब्दुर रेहमान प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, दलित, आदिवासी, मुस्लिम, कष्टकरी, वंचित समाजाचे अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत. या प्रश्नांवर अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्याकरिता वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढवीत आहे. आजही जनतेला पुरेशा मूलभूत सुविधा मिळत नाहीत. या समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहेत. त्या समस्या सोडवून सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. मोफत आणि दर्जेदार शिक्षण; याबरोबरच उत्कृष्ट सेवा-सुविधा देण्यावर आमचा भर आहे. म्हणूनच मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे, असेही रेहमान यांनी स्पष्ट केले.
अब्दुर रहमान यांच्या प्रचारार्थ धुळे शहरातून वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली काढण्यात आली. जिजामाता शाळेजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी जाहीर सभा झाली. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी अब्दुर रेहमान यांना विजयी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मंचावर फारुख अहमद, अरविंद निकम, कपिल अहिरे, दिलीप बोरसे, शंकर खरात, ॲड. संतोष जाधव, आबासाहेब खैरनार, चंद्रमणी वाघ, अमोल पवार, भैय्या पारेराव, योगेश जगताप, फक्रुऊद्दीन खाटीक, राहुल पाटोळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा
आयपीएस पदाचा राजीनामा मंजूर झाला नाही तरी उमेदवारी करणार! वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुर रहमान यांचे स्पष्टीकरण
प्रचंड शक्ती प्रदर्शनाने महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
महाविकास आघाडीतर्फे डॉ. शोभाताई बच्छाव यांचा उमेदवारी अर्ज दाखल
बागलाणच्या लहानु साबळेंची अपक्ष उमेदवारी
आनंदसिंग ठोके यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पक्षानेही दाखल केला उमेदवारी अर्ज