ॲड. महेंद्र भावसार यांची नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी
धुळे : शिक्षण क्षेत्रात शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर बाबींमध्ये काही बदल होणे आवश्यक आहे. हे बदल व्हावेत म्हणून शिक्षकांसाठी विधानपरिषदेत शिक्षकांचा आमदार प्रतिनिधी असावा म्हणून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी उमेदवारी करीत असल्याची भूमिका सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲड. महेंद्र भावसार यांनी स्पष्ट केली.
सोमवार दिनांक १३ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन ॲड. भावसार यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. शिक्षण क्षेत्रात कशा प्रकारे शिक्षकांवर अन्याय केला जातो. शिक्षकाची काही चूक नसतानाही त्याला कसे कायदेशीर बाबींमध्ये अडकविले जाते. याबाबत ऍड. भावसार यांनी काही उदाहरणे आणि दाखले देऊन सविस्तर स्पष्टीकरण दिले. कायद्यात कोणत्या त्रुटी आहेत आणि कायद्यातील कोणत्या कलमात कोणती दुरुस्ती केल्यामुळे शिक्षकांवरील अन्याय दूर होईल याबात एक स्वतंत्र प्रबंध तयार करून तो शासनाकडे देखील सादर केला. परंतु त्यानंतरही या दुरुस्तीबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वकिली क्षेत्रात आणि कायद्यात राहून शिक्षकांसाठी न्याय मिळविण्याचे कामकाज ३२ वर्षे केल्यानंतर असे निदर्शनास येते की, मूलभूत कायद्यातच काही बदल आवश्यक आहे. तसेच कायदा बदलण्याचे काम हे न्यायव्यवस्थेचे नाही तर ते संसदेचे अथवा विधानभवनाचे काम आहे. म्हणूनच शिक्षकांवरील अन्याय मुळापासून दूर करण्यासाठी विधानभवनात प्रवेश करून कायद्याचे मूलभूत बदल घडवून आणावे या उद्देशाने ३२ वर्षे शिक्षण क्षेत्रात वकिली केल्यानंतर विधान भवनात शिक्षकांच्या न्याय्य मागण्या आणि कायद्यातील मूलभूत बदल घडवून आणावे या उद्देशाने शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढविण्याचा माझा निर्णय आहे. यासाठीच रजकर्णात प्रवेश करीत असल्याचे ॲड. महेंद्र भावसार यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी ॲड. भावसार यांच्यासमवेत धुळे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. मधुकर भिसे, हाजी इस्माईल पठाण , एल एम सरदार शाळेचे चेअरमन डॉ. स्किल अहमद, राजीव सोनवणे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपस्थित होते.