धुळे (Dhule): मोराणे #morane येथील प्रताप नाना महाले खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा खरेदी केंद्राकडे थकीत लाखो रुपये मजुरी मिळत नसल्याने मापाडी कामगारांनी (mapadi kamgar) मंगळवारी देवपूरातील माथाडी कामगार मंडळाच्या कार्यालयाला कुलूप लाउन जोरदार घोषणाबाजी केली. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयात कोंडले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन कामगारांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच कर्मचार्यांची सुटका केली. यावेळी पोलिस आणि कामगारांमध्ये शाब्दीक चखमक उडाली. मापाडी (तोलणार) कामगारांची लेव्ही सह मजुरीची रक्कम माथाडी कायदा व योजनेतील तरतुदीनुसार वसुली संदर्भात माथाडी मंडळाच्या कार्यालयात १२६ दिवसापासून चालत असलेले उपोषण, धरणे आंदोलन तात्पुरते स्थगीत आले होते. मापाडी कामगारांना माथाडी मंडळाच्या वतीने हक्काचे काम व हक्काची मजुरी या करिता सदर अस्थापनेवर वसुलीसंदर्भात पुढील कार्यवाही मंडळाचे सचिव यांनी तात्काळ करणे अपेक्षीत होते. परंतु कार्यालयाकडून फक्त तोंडी आश्वासन देऊन टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे कामगारांच्या वतीने माथाडी मंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. आमच्या हक्काची मजुरी जर लवकर दिली नाही तर माथाडी मंडळाच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन करू, असा इशारा मापाडी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी कैलास शिंदे (kailas shinde), किशोर भडांगे, दीपक वाघ, यशवंत चौधरी, बापू अहिरे, संदीप खैरनार, संजय पाटील आदी कामगार उपस्थित होते.