भारत माता की जय म्हणून तरूणांना रोजगार मिळेल का? अमोल कोल्हे यांचा सवाल
धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी धुळ्यात महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत जनतेला, “मोदीचं ऐका…”, असा सल्ला दिला. 2014 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी गॅस सिलेंडर भाववाढीवरुन सिलेंडरला नमस्कार करुन मतदान करा, असे आवाहन केले होते.मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे तुम्ही जनतेने पंतप्रधान मोदीचं काहीतरी ऐकलं पाहिजे. यावेळी 20 तारखेला मतदानाला जाण्यापूर्वी सिलेंडरचे भाव तिप्पट वाढल्याने सिलिंडरला त्रिवार नस्कार करुन मतदान करायला जा,असे आवाहन खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेला केले.
महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरात अमोल कोल्हे यांची जाहीर सभा झाली. या सभेत भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांवर कोल्हे बरसले.
खासदार कोल्हे म्हणाले की, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर म्हणजेच डीएआयसीच्या दुसर्या टप्प्याचा पाठपुरावा योग्य पध्दतीने झाला असता तर येथील बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले असते. इकोनॉमिक
इंजिन धावले असते. धुळ्यात फ्लॅट संस्कृती झपाट्याने वाढत आहे. फ्लॅट घेताना आपण सोयीसुविधेसह आपल्या मुलांच्या सुरक्षेचा विचार करतो, मग मतदान करताना देशाचा विचार का करु नये? पंतप्रधान मोदी
वारंवार म्हणतात, 70 वर्षात काँग्रेसने काय केले? बीसीजीपासून पोलीओची लस जनतेला मोफत उपलब्ध करुन दिली. एक कोरोनाची लस उपलब्ध करुन दिल्यानंतर भाजपने मोठी जाहीरातबाजी केली. आज भाजप विकासाचं स्वप्न दाखवत आहे. देशावर 205 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. काँग्रेसच्या काळात 54 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. भाजपने दहा वर्षात 150 लाख कोटींचे कर्ज देशाच्या डोक्यावर लादले आहे. जन्माला आलेला प्रत्येक बाळ दिड लाख रुपयांचे कर्ज घेवून येत आहे. देशाच्या सकल उत्पन्नाच्या 80 टक्के कर्ज मोदींनी देशावर चढविले आहे. अर्थमंत्र्यांचे पतीच त्यामुळे देशाच्या अर्थस्थितीचे विदारक चित्र मानडतात. देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर असल्याचे सांगितले जाते. परंतु ही धुळफेक आहे. जेव्हा लोकांना वस्तुस्थिती कळते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मावर बोलायला लागतात. “जय श्रीराम, भारत माता की जय”, हा आमच्या भावनेचा, श्रध्देचा प्रश्न आहे. परंतु अशा घोषणा देवून रोजगार निर्माण होणार आहे का? सिलेंडरचे भाव कमी होतील का? पोटातल्या आगीला जात धर्म ठावूक नसतो. कांद्याने भाजपचा वांदा केला आहे. हे आता पक्के झाले आहे. कापूस, कांदा, सोयाबीनला भाव दिला जात नाही. शेतकर्यांची अवस्था वाईट आहे. कुस्तीपटू लेकींचं शोषण होतं. त्यावर कारवाई होत नाही. भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी फोडली. शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचे राज्यात स्थान काय? असा प्रश्न विचारला तर मराठी माणसाला आत्मभान देण्याचे काम बाळासाहेबांनी केले. तर शेतकर्याला स्वाभिमानी शरद पवार यांनी केले. गुजरातला उद्योग पळविले गेले. कांदा, कापुस, सोयाबीनचा प्रश्न निर्माण झाला. परंतु महायुतीच्या राज्यातील 39 पैकी एकाही खासदाराने तोंड उघडले नाही. त्यामुळे यांना मतदान का करायचे?
पंतप्रधान मोदींनी 2014 ला निवडणुकीत सिलेंडरला नमस्कार करुन मतदानाला जा असे सांगीतले होते. यावेळी देखील तुम्ही मोदीचं ऐका, फक्त एकदा नव्हेतर त्रिवार नस्कार करा, कारण सिलेेंडरचे भाव तिप्पट वाढले आहेत. ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात तरुणाई अडकत चालली आहे. तरुणांना आत्महत्त्या कराव्याशा वाटत आहेत. दोन कोटी रोजगाराची भाषा करणार्यांनी गेमिंगच्या जाळ्यात
तरुणांना अडकविले आहे. ऑनलाईन गेमिंगची सुरुवात कधी झाली? हा गेमिंग देशभर कसा पसरला? याचे उत्तर निवडणूक रोख्यांमध्ये आहे. फ्युचर गेमिंगने 500 कोटींचे निवडणूक रोखे भाजपसाठी घेतले. देशाच्या
तरुणांचे भविष्य ऑनलाईन गेमिंगच्या माध्यातून भाजपने पणाला लावले. त्यामुळे 20 तारखेला मतदान करताना पाच मिनिटे वेळ घ्या, योग्य विचार करा आणि मतदान करा. कारण हात बदलेगा हालात. म्हणून महाविकास आघाडीच्या उमे दवार डॉ. शोभा बच्छाव यांना मतदान करा, निवडून आणा असे, आवाहन खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
या सभेला व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, उेदवार शोभा बच्छाव, माजी आमदार सुधीर तांबे, अश्विनीताई पाटील, प्रतिभा शिंदे, माजी आमदार शरद पाटील, प्रथम महापौर भगवान करनकाळ, युवराज करनकाळ, महेश मिस्तरी, रणजित भोसले, डॉ. दरबारसिंग गिरासे, डॉ.अनिल भामरे, हितेंद्र पवार, ररेश श्रीखंडे, गणेश गर्दे, विजय देवरे, भगवान
गर्दे, शामकांत भामरे, प्रा.अविनाश पाटील, एल. आर. राव, अलोक रघुवंशी, अतुल सोनवणे, किरण जोंधळे, बाजीराव पाटील, गुलाबराव कोतेकर, गुलाब माळी,भरत मोरे, डॉ. सुशिल महाजन, धिरज पाटील, हेमा हेमाडे, डॉ. विलास बिरारीस, कपिल ढोके, बापू खैरनार आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा
सुलवाडे-जामफळचे श्रेय फक्त डॉ. सुभाष भामरेंना : मंत्री नितीन गडकरी