भाजप महानगरप्रमुख गजेंद्र अंपळकर, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकरसह पाच जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
धुळे : अल्पवयीन कुस्तीपटू मुलीच्या विनयभंग प्रकरणी मुख्य संशयितासह भाजप महानगरप्रमुख गजेंद्र अंपळकर, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकरसह पाच जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साक्री रोडवरील पत्रकार भवनात शनिवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत पीडित मुलीच्या आईने ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या दोन दिवसांवर असताना हे प्रकरण उघडकीला आल्याने भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपाचे महानगरप्रमुख गजेंद्र अंपळकर, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, सतीश अंपळकर यांच्यासह पाच जणांविरुद्ध POSCO सह भादंवी कलम 354, 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. अल्पवयीन पीडितेच्या वतीने तिच्या बहिणीने कोर्टात धाव घेतल्याने हा आदेश पारित झाला आहे.
अल्पवयीन मुलगी आणि तिचे दोन्ही भाऊ हे गजेंद्र अंपळकर यांच्या हर हर महादेव या व्यायाम शाळेत कुस्ती शिकण्यासाठी जात असत. या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रितिक उर्फ दादू राजेंद्र राजपूत पीडित युवतीशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘तू मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’, असे सांगून आग्रह धरला. ‘माझे ऐकले नाही तर तुझ्या परिवाराला जीवे ठार मारेल’ अशी धमकीही दिली. 10 जानेवारी रोजी याच कारणावरून पीडितेसह तिची आई व कुटुंबातील सदस्यांना रस्त्यात अडवून पुन्हा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच पीडित युवतीशी अंगलट येण्याचाही प्रयत्न केला. आरडाओरड करून स्वतःची सुटका करून घरी जात असताना गजेंद्र अंपळकर यांनी पोलिसात न जाण्याची धमकी दिली. मात्र तरीही पीडित युवतीची बहीण व तिची आई दोन्ही भावांसह चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात रात्री नऊ वाजता गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. उलट कल्याणी अंपळकर यांनी दाखल केलेली तक्रार नोंदवून घेत फिर्यादी, तिची आई व दोन्ही भावांना अटक केली. त्यामुळे त्यांना रिमांड होममध्ये ठेवण्यात आले. या गुन्ह्यात फिर्यादीच्या वडिलांचेही नाव गोवण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
बाहेर आल्यानंतर पुन्हा चाळीसगाव रोड पोलिसांना विनंती करण्यात आली मात्र त्यांनी नकार दिल्याने या संदर्भात न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. यावर न्यायालयाने खातरजमा करून पोक्सो सह भादंवी कलम 354, 323, 504, 506(2), 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. संशयित आरोपींमध्ये हर हर महादेव व्यायाम शाळेचा कुस्ती प्रशिक्षक दादू राजपूत, गजेंद्र महादेव अंपळकर, कल्याणी सतीश अंपळकर, सुहास सतीश अंपळकर, जतिन उर्फ अजय आव्हाळे यांचा समावेश आहे. कोर्टामार्फत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश झाल्याने या घटनेने सामाजिक व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.