शिक्षक आमदार निवडणुकीचे अभ्यासू उमेदवार ॲड. महेंद्र भावसारांच्या नगरमध्ये राजकीय पदाधिकारी व शिक्षक भेटी
अहमदनगर : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर ॲड. महेंद्र भावसार यांनी अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप, संगमनेर येथे सुधीर तांबे व राहुरी-देवळाली परिसरातील शिक्षकांच्या सदिच्छा भेट घेत संवाद साधला.
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी ॲड. महेंद्र भावसार यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. 34 वर्षांचा कायद्याचा अनुभव आणि शेकडो शिक्षकांची बाजू न्यायालयात मांडत असताना कायद्यातील त्रुटी शिक्षकांना न्याय मिळवून देण्यामध्ये अडसर ठरत असल्याचं वारंवार अधोरेखित होत असल्याने ॲड. महेंद्र भावसार यांनी कायद्यातील या त्रुटी दूर करण्यासाठी राजकारणामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी नाशिक विभागातून शिक्षक आमदार निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ॲड. भावसार यांनी गुरुवारी अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला व त्यानंतर अहमदनगर जिल्हा दौरा केला. यावेळी त्यांनी अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप, संगमनेर येथे सुधीर तांबे तसेच राहुरी देवळाली परिसरातील शिक्षकांच्या सदिच्छा भेट घेत त्यांचे मार्गदर्शन घेत संवाद साधला.
यावेळी ॲड. महेंद्र भावसार यांनी निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका आमदार जगताप, सुधीर तांबे यांच्यासमोर स्पष्ट केली. तसेच शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आजवर कायदेशीर लढा दिला. मात्र, कायद्यातील त्रुटी दूर व्हाव्या म्हणून राजकारणात प्रवेश करणे गरजेचे असल्याने आपण ही निवडणूक लढवून असंख्य अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी यापुढे कायदेशीर लढ्याला साथ म्हणून राजकीय लढा देण्याचा मानस बोलून दाखवला.
दरम्यान, यावेळी आमदार संग्राम जगताप व सुधीर तांबे यांनी ॲड. महेंद्र भावसार यांना शुभेच्छा दिल्या असून, त्यांचा या निवडणुका लढवण्यामागे असलेला शुद्ध हेतू पाहता सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही दिल आहे. आजवर शेकडो शिक्षकांना ॲड. भावसार यांनी न्याय मिळवून दिल्यानं राहुरी-देवळाली परिसरातील शिक्षकांनी देखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी ॲड. महेंद्र भावसार यांच्या समवेत चर्मकार महासंघाचे राज्य अध्यक्ष संजय खामकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप साळुंखे आदी उपस्थित होते.