जिल्हा रुग्णालयात सायंकाळची ओपीडी सुरू; जनक्रांती प्रतिष्ठानच्या मागणीला यश
धुळे : जिल्हा रुग्णालयात सायंकाळी 4 ते 6 ओपीडी सुरू करण्याची मागणी जनक्रांती प्रतिष्ठानने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत जिल्हा रुग्णालयात सोमवारपासून सायंकाळची ओपीडी सुरू झाली आहे. रूग्णांना आता सायंकाळी चार ते सहा वेळेत उपचार सेवा मिळणार आहे.
जन क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल चौधरी यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयात दुपारी चार ते सहा वाजेची ओपीडी गेल्या 30 ते 35 वर्षांपासून बंद आहे. काही दिवसांपूर्वी जनक्रांती प्रतिष्ठानकडे दुपारची ओपीडी बंद असल्याची तक्रार आली. तसेच जिल्हा रुग्णालय येथे संपूर्ण जिल्हाभरातून दररोज रुग्ण येत असतात व ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील अधिक आहे. यातच दुपारी चार ते सहा या वेळेतली ओपीडी बंद असल्याकारणाने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध असून देखील रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागते. या सर्व बाबी लक्षात घेता जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर ओपीडी सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.
निवेदन दिल्यानंतरही ओपीडी सुरू करण्यास विलंब होत असल्याने जनक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल चौधरी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन या विषयाची माहिती दिली. पालकमंत्री यांनी देखील तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक दत्ता देवगावकर यांना फोन करून याबाबत विचारपूस केली. तसेच लवकरात लवकर ओपीडी सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारपासून आओपीडी सुरू झाली आहे.
यावेळी त्या ठिकाणी उपस्थित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने फुलपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांचा देखील सत्कार करण्यात आला. जिल्हा रुग्णालयात दुपारची ओपीडी सुरू होणार असल्याचे कळताच जिल्हाभरातून समाधान व्यक्त होत आहे. दुपारी चार ते सहा या वेळेत ओपीडी कायम सुरू राहणार आहे. रुग्ण सेवेत येणाऱ्या अडचणींची तक्रार जनक्रांती प्रतिष्ठानकडे करावी, असे आवाहन देखील प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल चौधरी यांनी केले.
या प्रसंगी सोनू मुर्तडक, दीपक कोळी, मुकेश थोरात, जय किशन चौधरी, सचिन पाटील, रोहित चौधरी, मिलिंद कानुगो, हरीश चौधरी, हर्षल बोरसे, करण कर्पे, पवन धात्रक उपस्थित होते.