शिक्षणाधिकारी कार्यालयातील महिला अधीक्षक दोन लाखांची लाच स्वीकारताना गजाआड
धुळे : येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक मीनाक्षी गिरी यांना शिक्षक दाम्पत्याकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने मंगळवारी सायंकाळी रंगेहात पकडले.
या गुन्ह्यातील लाचखोर अधिकारी श्रीमती मीनाक्षी भाऊराव गिरी या शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयातील अधीक्षक आहेत. तसेच वेतन व भविष्य निर्वाह निधी विभागाच्या अधीक्षक म्हणूनही त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. महानगरपालिका शाळेतील शिक्षक दाम्पत्याकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी कार्यालयातील महिला अधीक्षक मीनाक्षी गिरी यांना रंगेहात पकडण्यात आले.
काय आहे नेमकं प्रकरण : या प्रकरणातील तक्रारदार व त्यांची पत्नी धुळे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 30 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयान्वये त्यांचे एप्रिल 2022 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीतील थकीत वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता मंजूर झाला. शिक्षण संचालक पुणे यांनी थकीत वेतनाची रक्कम माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय धुळे यांच्या खात्यात जमा केली. परंतु थकीत वेतन तक्रारदार व त्यांच्या पत्नीस अदा न झाल्याने त्यांनी श्रीमती मीनाक्षी गिरी यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन वेळोवेळी भेट घेतली. परंतु मिनाक्षी गिरी यांनी प्रत्येक वेळेला वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार व त्यांच्या पत्नीस त्यांचे थकीत वेतन अदा करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर 15 ते 20 दिवसांपूर्वी तक्रारदार यांनी श्रीमती मीनाक्षी गिरी यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन पुन्हा भेट घेतली आणि थकीत वेतन अदा करण्याची विनंती केली. त्यावेळी मीनाक्षी गिरी यांनी या शिक्षक दाम्पत्याकडून दोन लाख रुपयांची मागणी केली. मीनाक्षी गिरी यांनी पैशांची मागणी करतात तक्रारदार शिक्षकाने 20 ऑगस्ट रोजी एसीबी चे कार्यालय गाठले आणि हरित सर तक्रार दाखल केली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सदर तक्रारीची त्वरीत पडताळणी केली. आणि या पडताळणी दरम्यान अधीक्षक मीनाक्षी गिरी यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी करून ही रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे एसीबीच्या पथकाने शिक्षणाधिकारी कार्यालयात सापळा लावला. त्यावेळी तक्रारदार शिक्षकाकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना वेतन अधीक्षक मीनाक्षी गिरी यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई : ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, सापळा पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली. या कारवाईसाठी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि वाचक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले.