आझाद समाज पार्टीतर्फे धुळ्यात रास्ता रोको, मोर्चा
धुळे : सर्वोच्च न्यायालयाचा एससी. एसटी. आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निकाल घटनाबाह्य असून, तो जनतेला अमान्य आहे. जनतेने पुकारलेल्या 21 ऑगस्ट रोजीच्या भारत बंदला आझाद समाज पार्टीने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
धुळ्यातही आझाद समाज पार्टीतर्फे रास्ता रोको करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच तीव्र स्वरूपाची निदर्शने करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा देशभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून दिला आहे.
आझाद समाज पार्टीचे नेते आनंद साहेबराव लोंढे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात धुळे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर, धुळे शहर अध्यक्ष भैय्या वाघ, जिल्हा संघटक महेंद्र बोरसे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.