कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी निशुल्क निविष्टा मिळण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
धुळे : शिरपूर तालुक्यातील कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत खतांचा मोफत पुरवठा होणार आहे.
कृषि विभागामार्फत कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारीत पीक पध्दतीस चालना देऊन शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मुल्यसाखळीस चालना देणे, या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि तेल उत्पादकता वाढ व मुल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 य तीन वर्षात राबविण्यात येत आहे, असे तालुका कृषी अधिकारी, शिरपूर संजय पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
सन 2024-25 मध्ये ‘योजनांतर्गत चालू खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकासाठी नॅनो युरीया, नॅनो डिएपी, मेटाल्डीहाइड तसेच कापूस पिकासाठी नॅनो युरीया, नॅनो डिएपी, कापूस साठवणूक बॅग निविष्टा तालुका कृषि अधिकारी कार्यालय, शिरपूर येथे पुरविण्यात आल्या आहेत. त्यापैकी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने सोडत अंती वाटप झालेल्या निविष्टांपैकी शिल्लक राहिलेल्या निविष्टांकरीता ऑफलाईन पध्दतीने सोयाबीन व कापूस पीक लागवड केलेल्या शेतक-यांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. या निविष्टांची आवश्यकता असलेल्या शेतकरी बांधवांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरीता कार्यालयाने निश्चित करून दिलेला विहित नमुन्यातील अर्जासोबत 7/12, 8अ, स्वयंघोषणापत्र, आधारकार्डची छायांकित प्रत, अनु. जाती/जमातीच्या जातीचा दाखल्याची प्रत (आवश्यकता असल्यास) तालुका कृषि अधिकारी कार्यालय, शिरपूर, सार्वजनिक बांधकाम शासकीय विश्रामगृहाच्या मागे, आमोदे शिवार येथे स्वीकारण्यात येतील.
सदरचे अर्ज 26 ते 30 ऑगस्ट, 2024 पर्यंत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यत कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत. ऑफलाईन पध्दतीने प्राप्त झालेले अर्ज शिल्लक असलेल्या निविष्टांपेक्षा जास्त प्रमाणात प्राप्त झाल्यास त्याची त्वरीत सोडत पध्दतीने निवड करून याद्या प्रसिध्द करण्यात येतील. तद्नंतर निवड झालेल्या शेतक-यांना लवकरच निविष्टा वाटपाबाबतची कार्यवाही मंडळ कृषि अधिकारी स्तरावरून केली जाणार आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी तालुका कृषि अधिकारी, शिरपूर कार्यालयात अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी पवार यांनी केले आहे.