मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
धुळे : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-2025 या आर्थिक वर्षांत राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रोजगार इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
राज्यातील उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करण्याची ही योजना असून यासाठी राज्य शासनाने 5 हजार 585 कोटी 30 लाख निधी उपलब्ध करुन दिला आहे. या योजनेंर्गत उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण (इंटरशिप) द्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत बारावी पास विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये, आयटीआय/पदविकाधारक विद्यार्थ्यांना 8 हजार तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 10 हजार विद्यावेतन दरमहा डीबीटी पद्धतीने देण्यात येईल.
योजनेचे ठळक वैशिष्टे :
- योजनेचा लाभ घेण्यासाठी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकतील. मात्र शिक्षण चालु असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाही.
- विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग/स्टार्टअप्स, विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवतील. सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) च्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील.
- सदर कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) चा कालावधी 6 महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना या शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. हे विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येईल.
आस्थापना/उद्योजकासाठी पात्रता :
- आस्थापना / उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.
- आस्थापना / उद्योजकाने www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील होमपेज वरील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत उद्योजक /आस्थापना नोंदणी या टॅबमधील फॉर्म भरुन सबमिट करावा.
- आस्थापना / उद्योगाची स्थापना किमान 3 वर्ष पूर्वीची असावी.
- आस्थापना/उद्योगांनी इपीएफ, इएसआयसी, जीएसटी, डीपीआईटी व उद्योगआधारची नोंदणी केलेली असावी.
उमेदवारांची पात्रता :
- उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे.
- उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास/ आयटीआय/पदविका/पदवीधर / पदव्युत्तर असावी.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
- उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
- उमेदवाराचे बैंक खाते आधार संलग्न असावे.
धुळे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवाराने www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावरील होमपेज वरील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत उमेदवार नोंदणी या टॅबमधील फॉर्म भरुन सबमिट करुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त श्री. वाकुडे यांनी केले आहे.