कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रती हेक्टर पाच हजार रूपये
धुळे : राज्य शासनाने सन 2023 वर्षांतील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 5 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या अर्थसहाय्याच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक ना-हरकत पत्र व आधार कार्डची छायांकीत प्रत आपल्या कृषी सहाय्यकाकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कैलास शिरसाठ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनचे कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाय म्हणून शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम सन 2023 खरीप हंगामामधील कापुस व सोयाबीन उत्पादक असलेल्या तसेच ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पेऱ्याची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र, सामूहिक शेती असल्यास सामूहिक खातेदाराचे ना-हरकत प्रमाणपत्र, आधारकार्डची छायांकीत प्रत तातडीने संबंधीत कृषि सहाय्यक यांच्याकडे सादर करावी, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. शिरसाठ यांनी कळविले आहे.