सोयाबीनवरील विषाणूजन्य हिरवा आणि पिवळा मोझेंक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन
धुळे : सद्यास्थितीत बऱ्याच भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिवळा मोझॅक हा रोग मुंगबीन यलो मोझॅक वायरस या विषाणूंमुळे होतो तर हिरवा मोझॅक हा सोयाबीन मोझॅक वायरस या विषाणूमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. या विषाणूजन्य रोगामुळे सोयाबीनमध्ये 15 ते 75टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोगाची लक्षणे ओळखुन एकात्मिक व्यवस्थापन करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कैलास शिरसाठ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
रोगाची लक्षणे :
हिरवा मोझॅक : यामध्ये झाडाची पाने ही जाडसर, आखूड तसेच कडक होतात व खालच्या बाजूने सुरकुतलेली किंवा मुरगळलेली असतात. पाने साधारण पानांपेक्षा जास्त गर्द हिरव्या रंगाची दिसतात. प्रादुर्भावामुळे झाडाची वाढ खुंटते. हा विषाणू बियाणे व पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः मावा या रसशोषक किडीद्वारे केला जातो.
पिवळा मोझॅक : सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार पांढरी माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो.
रोगास कारणीभूत घटक : केवडा रोग उबदार तापमान, अति दाट पेरणी या रोगाच्या वाढीस कारणीभूत ठरते. तसेच आंद्र हवामानात हा रोग वाढत जातो.
नुकसानीचा प्रकार : दोन्हीही प्रकारच्या मोझॅकमुळे झाडाच्या अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये बाधा होऊन अशा प्रादुर्भावग्रस्त झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात. त्यातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात. पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. तसेच दाण्यांमधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे वेळीच या रोगाला ओळखून तसेच मावा व पांढऱ्या माशीचे नियंत्रण करून या रोगाचे व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.
सोयाबीनवरील पांढरी माशी, मावा आणि मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापन : काही सोयाबीन पिकाचे वाण या रोगास लवकर आणि जास्त प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे या रोगास बळी पडणाऱ्या वाणाची लागवड न करता आपल्या भागात विद्यापीठाद्वारे शिफारस केलेल्या सोयाबीन वाणांचीच लागवड करावी. पेरणीस निरोगी बियाण्याचाच वापर करावा. लागवडीनंतर वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे. मोझॅक (केवडा) झालेली प्रादुर्भावग्रस्त झाडे दिसून येताच ती वेळोवेळी तात्काळ समूळ काढून बांधावर न फेकता जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट करावीत जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये १२ इंच x १० इंच आकाराचे हेक्टरी १० ते १५ पिवळे चिकट सापळे लावावेत. नत्रयुक्त खताचा संतुलित वापर करावा. मूग, उडीद यासारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोझेंक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी अशा पिकावरील पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे. पीक तणमुक्त ठेवावे. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून असिटामिप्रीड २५ टक्के + बाइफेन्थ्रीन २५ टक्के डब्ल्यू जी १०० ग्रॅम (५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात साध्या पंपाने) (लेबल क्लेम कीटकनाशक) किंवा थायमिथोक्झाम १२.६ टक्के + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.६ टक्के झेडसी ५५ मिली (२.५ मिली प्रती १० लिटर पाण्यात साध्या पंपाने) (लेबल क्लेम नाही) यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रति एकर या प्रमाणात करावी. वरील कीटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे. पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे. मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर परत एकदा कीटकनाशकांची फवारणी करावी.
फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू ५ ते ७ असावा, शेतात कीटकनाशकाचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे, तोंडावर मास्क व संरक्षित कपड्याचा वापर करावा तसेच गुटखा, तंबाखु खाऊ नये व बीडी पिऊ नये. बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात पर्यायाने किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.असेही कृषी विभागाने कळविले आहे.