विधानसभा निवडणुकीचं कामकाज भाजपच्या नवीन कार्यालयातून : गजेंद्र अंपळकर
धुळे : भारतीय जनता पक्षाचं धुळ्यातील हायटेक कार्यालयाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं असून, आता प्लास्टर, फर्निचर आणि इतर फिनीशिंगची कामं हाती घेतली आहेत, अशी माहिती भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांना दिली. इमारतीमधील एका हाॅलचं काम 15 दिवसांच्या आत पूर्ण करून याच कार्यालयातून विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचं काम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यात कोणत्याही जिल्ह्यात नसेल असं भाजपचं हायटेक कार्यालय धुळ्यात होत आहे. या कार्यालयासाठी गजेंद्र अंपळकर यांनी पुढाकार घेतला आणि स्वमालकीची पाच कोटी रूपयांची रोडटच जागा पक्षाला दान केली. चाळीसगाव चौफुलीवर गजेंद्र अंपळकर यांच्या निवासस्थानाशेजारी असलेल्या या कार्यालयाचं काम प्रगतीपथावर आहे. गजेंद्र अंपळकर यांनी शनिवारी कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केलं.
गजेंद्र अंपळकर यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात सर्वात उच्च प्रतीचं आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त असं हायटेक कार्यालय धुळे शहरात सुरू करत आहोत. बांधकाम बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे. प्लास्टरचं काम सुरू आहे. येत्या पंधरा दिवसात हॉलचं काम पूर्ण करून त्या ठिकाणी पक्षाचं कामकाज सुरू करणार आहोत. विधानसभा निवडणुकीचं काम या इमारतीमधूनच चालणार आहे. पहिल्या मजल्यात पार्किंगची व्यवस्था केली आहे. दुसऱ्या मजल्यावर अध्यक्ष आणि विविध आघाडीच्या अध्यक्षांची कार्यालयं असणार आहेत. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर 500 कार्यकर्ता बसण्याची क्षमता असलेला हॉल तयार करण्यात येत आहे. या हॉलमध्ये पक्षाचे विविध कार्यक्रम होतील. मीडियासाठी देखील हायटेक यंत्रणा असलेला स्वतंत्र कक्ष असणार आहे. येत्या सहा महिन्याच्या आत भारतीय जनता पार्टीचं कार्यालयाचं काम पूर्ण होईल, अशी माहिती गजेंद्र अंपळकर यांनी दिली.
हेही वाचा
पाच कोटी रुपयांची जागा भाजपला दान देणारा शेठ!