आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सभारंभ
धुळे : गुजरात राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते सी. आर. पाटील यांच्या कन्या धरतीताई यांचे शिक्षण गुजरात राज्यात झाले आहे. त्यामुळे त्यांना मराठी भाषा चांगल्या पद्धतीने येण्याचा प्रश्नच नाही. परंतु जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे यांच्या सुनबाई म्हणून धुळ्यात आल्यानंतर त्यांनी मराठीचे धडे गिरवायला सुरुवात केली. जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रीय झाल्यावर त्यांनी मराठी भाषेवर इतके प्रभुत्व मिळविले की, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या नात्याने शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणाने सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
शिक्षकांचे महत्व वेगळे असल्याने आपण त्यांना गुरूंचे स्थान दिले आहे. समाज परिवर्तनातही शिक्षकांची भूमिका महत्वाची असते. आज प्रत्येकाला शाॅर्टकट हवा आहे. मेहनत नकाे आहे. त्यामुळे शिल्पकार ज्याप्रमाणे मातीच्या गाेळ्याला आकार देताे, त्याप्रमाणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देवून चांगला समाज घडवावा, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांनी व्यक्त केली.
पाच सप्टेंबर शिक्षक दिनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सभारंभ झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून अध्यक्षा धरती देवरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिक्षण सभापती साेनी कदम, महिला सभापती ज्याेती बाेरसे, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेंद्र साेनवणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनिष पवार, निरंतन शिक्षणाधिकारी जे. ए. पाटील, डाएटच्या प्राचार्या मंजुषा क्षिरसागर, जिल्हा परिषद सदस्या सत्यभामा मंगळे आदींसह इतर अधिकारी उपस्थित हाेते.
याप्रसंगी अध्यक्षा धरती देवरे यांनी सांगितले की, एखाद्या डाॅक्टरकडून चुकीचे उपचार झाले तर रूग्णाला त्रास हाेताे. परंतु शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढी उध्वस्त हाेते. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी माेठी आहे. आज त्यांना इतरही कामे करावी लागत असल्याची आम्हालाही जाणीव आहे. जिल्हा परिषद शाळेत अनेक गरीब विद्यार्थी असतात. त्यांच्या पालकांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसताे. ते डाेळे झाकून मुलांना शिक्षकांच्या भरवशावर शाळेत साेडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सांगले संस्कार देवून चांगला समाज घडवावा, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी प्राचार्या मंजुषा क्षिरसागर यांनी सांगितले, शिक्षण व्यवस्थेत अनेक बदल घडविले आहेत. ते बदल स्वीकारत आज शिक्षण व्यवस्था टिकून आहे. तरीही प्रत्येकाने आपल्या आयुष्यात नम्रता गुण बागळणे गरजेचे आहे. तर कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांनी ‘आदर्श’ऐवजी उत्कृष्ट, श्रेष्ठ असे शब्द वापरण्याची विनंती करीत पुरस्कारासाठी काेणीही शिफारस करू नये, असे सांगितले. प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी महेंद्र साेनवणे, सुत्रसंचालन देवयानी वाघ, तर आभारप्रदर्शन उपशिक्षणाधिकारी संजीव विभांडिक यांनी मानले.
आदर्श पुरस्कार वितरणासह उत्तेजनार्थ सन्मान : या कार्यक्रमात जिल्ह्यातील चारही तालुक्यातील प्रत्येकी एक शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. धुळे तालुका रूखमा महारू पाटील (जि. प. शाळा गाेताणे), साक्री तालुका श्रीकांत दिलीप अहिरे, (जि. प. शाळा डांगशिरवाडे), शिंदखेडा तालुका नरेंद्र श्रीराम पाटील (जि. प. शाळा जुनी आच्छी) आणि शिरपूर तालुक्यातून प्रतिभा रमेश बारी (जि. प. शाळा अर्थे खु) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले. तसेच नऊ प्रस्ताव दाखल हाेते. त्यातील उर्वरित शिक्षकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले.
शिक्षकाचे महत्व केवळ शाळेपुरतेच नव्हे तर आयुष्यातही महत्वाचे आहे. काळ, वेळेनुसार शिक्षण व्यवस्थेत बदल झाले. शिक्षकांच्या अधिकारावर मर्यादा आल्या आहेत. पुरस्कारामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. परंतु तीन हजारापैकी केवळ नऊच प्रस्ताव आले. पुढील वर्षी ती संख्या वाढली पाहिजे -विशाल नरवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. धुळे