येत्या वर्षभरात धुळे जिल्ह्यातील सव्वा लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार, 1058 कोटी रुपये खर्चाच्या जामफळ धरण बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे भुमिपुजन संपन्न
धुळे : शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या जामफळ प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनच्या कामाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. सोंडले शिवारात प्रकल्पस्थळी मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाला धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती होती. शिंदखेडा तालुक्यातील 54 गावांच्या हजारो हेक्टर शेतजमीनी ओलीताखाली येणार आहेत. जामफळ प्रकल्पातील पाणी पाईपलाईनद्वारे थेट शेतांमध्ये जाणार आहे.
सुलवाडे-जामफळ-कनोली प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजनेतील बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमुळं शिंदखेडा तालुक्यातील सव्वा लाख एकर शेतजमीन सुजलाम् सुफलाम् होवून हरीत क्रांती होईल, असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केलं.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार अमरिशभाई पटेल, जयकुमार रावल, काशिराम पावरा, मंजुळा गावित, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक ज. द बोरकर, अधिक्षक अभियंता सु. स, खांडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की, आजचा दिवस धुळे जिल्ह्यासाठी महत्वाचा आहे. आजपासून खऱ्या अर्थाने शिंदखेडा तालुक्याची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. या प्रकल्पामुळे शिंदखेडा तालुक्यातील सव्वा लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेला सन 1999 मध्ये मंजूरी दिली. सन 1999 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यापासून 18 वर्षांत 26 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. तर गेल्या सात वर्षात 2100 कोटी रुपयांचा निधी देऊन या प्रकल्पाला चालना दिली. हा प्रकल्प पुर्ण होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना समक्ष भेटून पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्राचा दुष्काळ कायमस्वरुपी दूर करण्यासाठी बळीराजा जलसंजिवनी योजनेत समाविष्ट करुन राज्याच्या दुष्काळी भागासाठी कृषी सिंचन योजनेतून 30 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना त्वरीत मंजुरी दिली.
सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजनेचे काम मोठ्या गतीने सुरू असून ते काम पुर्णत्वाकडे आहे. त्यानंतर तापी नदीचे जामफळ धरणात आलेले पाणी शिंदखेडा तालुक्यातील 54 गावांना जामफळ धरणातून 728 किलोमिटर लांबीच्या भूमिगत पाईप लाईनद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे या गावातील एकूण 42 हजार 513 हेक्टर जमीन एका वर्षात सिंचनाखाली येणार आहे. या कामासाठी माजी खासदार डॉ. सुभाष भामरे व आमदार जयकुमार रावल यांनी सतत पाठपुरावा केल्याचेही त्यांनी सांगितले.
तापी नदीतील पावसाळ्यातील वाहून जाणारे महाराष्ट्राचे हक्काचे 9.24 टी.एम.सी पाणी 5 पंपगृहांमध्ये स्थापित होणाऱ्या 75 हजार 458 एचपी क्षमतेच्या 32 पंपाद्वारे उपसा करून शिंदखेड्यातील 54 गावातील 42 हजार 513 हेक्टर तर धुळे तालुक्यातील 49 गावातील 10 हजार 207 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तसेच हे पाणी पांरपरिक पद्धतीने कालवा वितरण प्रणाली ऐवजी गुरुत्वीय बंदिस्त वितरण प्रणालीद्वारे देण्यात येणार असल्याने वीजेचा खर्च कमी येणार आहे. येत्या काळात शेतकऱ्यांना सोलरमार्फत वीज पुरवठा करण्यात येऊन शेतकऱ्यांना वर्षभर दिवसा वीज देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खान्देशातील प्रकाशा बुराई सिंचन योजना, अनेर मध्यम प्रकल्प, वाडी शेवाडी मध्यम प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्गामुळे भविष्यात धुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महायुती सरकारने राज्यातील नागरिकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण, महिलांना एस.टी बस मध्ये 50 टक्के सवलत, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत 10 लाख युवकांना रोजागार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांना निधीची कमतरता भासू देणार नाही असेही त्यांनी सांगितले.
सुलवाडे जामफळ कनोली प्रकल्प शेतकऱ्यांना जीवनदान देणारा : गिरीष महाजन
पालकमंत्री गिरीष महाजन म्हणाले की, आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. सुलवाडे जामफळ योजनेस 1999 ला प्रशासकीय मान्यता मिळाली त्यानंतर प्रकल्पास आवश्यक निधी उपलब्ध करून प्रकल्प जलदगतीने पूर्ण करून तसेच दुष्काळग्रस्त भागातील जनतेला लवकरात लवकर सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने या योजनेचा समावेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अवर्षण प्रवण व शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील 91 प्रकल्पांसोबत केंद्र शासनाच्या बळीराजा जल संजीवनी योजनेत समावेश करण्यात आला. प्रकल्प पूर्ण करण्याकरिता रु. ५१८ कोटी केंद्र अर्थसहाय्य, रु. १५५० कोटी नाबार्ड चे अर्थसहाय्य व रु. ३३९ कोटी राज्य सरकारचा निधी असे एकूण रु. २४०७ कोटी निधी मंजूर करून दिला आहे. तेव्हापासून योजनेचे काम गतीमान पद्धतीने सुरू असून आतापर्यंत योजनेचे ७३ टक्के काम पूर्ण झाले आहे. या योजनेस केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातुन रु.२१२० कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात जवळपास सव्वा लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. हा प्रकल्प येथील शेतकऱ्यांना जीवनदान देणार प्रकल्प ठरणार आहे. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तसेच राज्यातील महायुती सरकारने अनेक विकास योजना आणल्या आहेत. रस्ते, रेल्वे, विमानसेवा, रुग्णालय, सर्व नागरिकांना 5 लाख रुपयांचा मोफत विमा योजना, अंत्योदय योजनेतंर्गत मोफत धान्य योजना, महिलासाठी मोफत सिलेंडर, शेतकऱ्यांचे वीज बील माफ, मुलींना उच्च शिक्षण मोफत अशा अनेक योजना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
येत्या वर्षभरात प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी येणार : आमदार रावल
आमदार जयकुमार रावल म्हणाले की, जामफळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातील 54 गावांना शेतीसाठी थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या ‘बंदिस्त नलिका वितरण प्रणाली’ (PDN) योजनेच्या शुभारंभ आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते संपन्न झाले. शेतकरी शिव संवाद विकास यात्रेची सुरुवात 5 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर अशी एकूण 35 दिवस 161 गावामधून करण्यात आली. या यात्रेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिंदखेडा तालुक्यासाठी 15 हजार सिंचन विहिरी दिल्यात आहे. सुलवाडे जामफळ योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातील 54 गावांना जामफळ धरणातून 728 किलोमिटर लांबीच्या भूमिगत पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे या गावातील एकूण 42 हजार 513 हेक्टर जमीन एका वर्षात सिंचनाखाली येणार असल्याने शिंदखेडा तालुका कायमचा दुष्काळमुक्त होणार असून येत्या दीड वर्षांत प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
माजी खासदार डॉ.भामरे म्हणाले की, सुलवाडे जामफळ ही जिल्ह्यासाठी संजिवनी ठरणारी योजना आहे. ही योजना मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या योजनेला 2400 कोटींचा निधी मंजूर झाला असून या योजनेचे 73 टक्के कामपूर्ण झाले आहे. 9 टीएमसी पाण्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील 54 तर धुळे तालुक्यातील 49 गावांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी धरणाच्या साईटला भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक ज. द. बोरकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार अधिक्षक अभियंता खांडेकर यांनी मानले.