ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत पहिल्यांदाच मनपा हद्दीत विकास
धुळे : शहरापासून जवळच वडजाई रस्त्यालगत अनवर नाल्याच्या काठावर वसलेली पिंपरी आदिवासी वस्ती स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही विकासापासून वंचित आहे. विशेष म्हणजे ही वस्ती दहा वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या हद्दीत आली. परंतु तरीही या आदिवासी बांधवांपर्यंत शासनाचा किंवा पालिकेचा निधी पोहोचलाच नाही. त्यामुळे या वस्तीमध्ये ना रस्ते आहेत, ना गटारी! मुळात मुलभूत सोयी-सुविधा, पिण्याचे शुद्ध पाणी किंवा विकासाच्या नावाचे काहीही नाही.; वस्तीमध्ये आहेत ती केवळ घरे आणि माणसे. विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या या वस्तीमध्ये आता धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी विकासकामांना सुरूवात केली आहे.
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत आदिवासी वस्ती येथील रस्ते व गटार करणे या कामाचा शुभारंभ बुधवारी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते झाला. स्वातंत्र्यकाळापासून सुमारे 70 वर्षांपासून धुळे शहरातील आजूबाजूच्या आदिवासी वस्त्यांमध्ये विकासाचे काम झालेले नव्हते. आमदार फारुख शाह यांनी धुळे शहराच्या विकासकामांमध्ये सर्व समाजातील व सर्व वंचित घटकांना न्याय दिला. आदिवासी, दलित वस्ती तसेच ज्या भागात मूलभूत सुविधा नव्हत्या; त्या भागापर्यंत विकासाची गंगा त्यांनी आणली. पिंपरी आदिवासी वस्तीमध्ये ना रस्ते होते, ना गटारी होत्या; ती परिस्थिती बघून आमदार फारुख शाह यांनी आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे ग्रामीण भागासाठी असलेली ठक्कर बाप्पा योजना शहरासाठी विशेषतः महानगरपालिका क्षेत्रासाठी लागू करण्यात आली आणि तसा दुरुस्तीचा शासन निर्णय काढण्यात आला. आजपर्यंत कोणत्याही आमदाराने केले नसेल असे क्रांतिकारी काम आमदार शाह यांनी केले आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत फक्त ग्रामीण भागासाठी निधीचे वितरण असे. परंतु आमदार फारुख शाह यांनी शहरी भागासाठी देखील हा निधी खेचून आणलेला आहे. ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत पिंपरी शिवार, जय मल्हारनगर तसेच जमनागिरी भिलाटी या भागात कोट्यवधी रुपयांची कामे होणार आहेत. त्या कामांची सुरुवात आमदार फारुख शाह यांनी बुधवारपासून केली.
पिंपरी शिवारातील आदिवासी बंधूं आणि भगिनींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “आम्हाला वस्तीच्या विकासकामांसाठी आजपर्यंत कोणत्याही आमदाराने सहकार्य केले नाही. परंतु आमदार फारुख शाह यांनी केवळ वचन न देता आमचे काम करून दिले. येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू आणि त्यांना पुन्हा निवडून आणू. कारण या भागात आजपर्यंत रस्ते, गटारी नाहीत. आमदार फारुख शाह यांनी आदिवासी वस्तीकरिता निधी आणला. त्यासाठी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो.”
या कार्यक्रमाला मोहन मोरे, किशोर मोरे, करण ठाकरे, परशुराम पवार, इंदल सोनवणे, संतोष ठाकरे, राहुल गायकवाड, अर्जुन अहिरे, किरण सोनवणे, बादल सोनवणे, विजय गायकवाड, हिराबाई सोनवणे, विमलबाई ठाकरे, शकुंतला मोरे, यमुबाई जाधव, आमीर पठाण, मौलाना शकील, छोटू मच्छीवाले, साजिद साई, प्यारेलाल पिंजारी, निजाम सय्यद, डॉ. बापूराव पवार, डॉ. दीपश्री नाईक, फैजल अन्सारी, हारुन खाटीक, मलिक खाटीक, साजिद शाह, परवेज शाह, आसिफ शाह, समीर शाह, शाबान शाह, सुलतान शेख, रफिक शाह यांच्यासह आदिवासी बंधू-भगिनी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.