पेसा क्षेत्रातील शिक्षकांची कंत्राटी रिक्तपदासाठी 9 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज सादर करावे!
धुळे : जिल्हा परिषद, धुळे मधील पेसा क्षेत्रातील रिक्त असलेल्या जागेवर तसेच १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये प्राथमिक शिक्षकांची पदे तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी 9 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य सस्थांच्या शाळेतील तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार, धुळे जिल्हा परिषदेमधील पेसा क्षेत्रातील रिक्त असलेल्या जागेवर व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये प्राथमिक शिक्षकांची पदे तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर कंत्राटी पध्दतीने भरण्यासाठी ३ ऑक्टोंबर २०२४ ते ९ ऑक्टोंबर, २०२४ (सुटीचा दिवस वगळता) कार्यालयीन वेळेत अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, धुळे यांच्या नावे शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, धुळे या कार्यालयात सादर करावेत. कंत्राटी शिक्षक पदासाठी प्रतिमाह १५ हजार मानधन देय राहील.
इयत्ता पहिले ते पाचवीसाठी शैक्षणिक पात्रता धारण करित असलेल्या सर्व प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२ उत्तीर्ण असणे आवश्यक राहील. एसएससी प्रमाणपत्र, एचएससी प्रमाणपत्र, डीएड, डीटीएड, डीईआयईडी गुणपत्रक व प्रमाणपत्र, टीईटी / सीईटी मार्कशीट व प्रमाणपत्र, संगणक प्रमाणपत्र, आधार कार्ड हे कागदपत्र अर्जासोबत सादर करावेत. नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा असेल. वरील सर्व शैक्षणिक पात्रता ही १२ फेब्रुवारी,२०२३ पर्यंत धारण केलेली असावी. सदर दिनांकानंतर धारण केलेली असल्यास आपला अर्ज स्विकारला जाणार नाही. असेही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नरवाडे यांनी कळविले आहे.