#Dhule #the-story-of-cannabis-farming
महाराष्ट्र (maharashtra) आणि मध्यप्रदेशची (madhyapradesh) सिमा (border) सातपुडा पर्वतरांगेने (satpuda) वेढली आहे. अतिदुर्गम असलेला हा भाग आदिवासीबहूल आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. या भागातून बनावट दारु, गावठी बनावटीची शस्ञास्ञे आणि गांजाचा अवैध धंदा मोठ्या प्रमाणात चालतो. वेगवेगळ्या धंद्यात स्थानिक तसेच परप्रांतीय डाॅन आणि त्यांच्या टोळ्या सक्रीय आहेत. आदिवासींमधील बेरोजगारी आणि अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांना पैशांचे आमिष दाखउन त्यांच्याकडून अवैध धंदे करवून घेतले जातात. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या लाकड्या हनुमान आणि बोराडीच्या वरच्या पट्ट्यामध्ये गांजाची शेती सर्रासपणे केली जाते. गावठी कट्टे असो, बनावट दारु असो की गांजा, पोलिसांनी अनेक कारवाया करुन देखील हा धंदा रोखण्यात त्यांना यश आले नाही. गांजा शेतीविषयी नंबर वन महाराष्ट्र न्यूज पोर्टलने केलेली ही स्टोरी…
धुळेः शिरपूर (shirpur) तालुक्यातील लाकड्या हनुमान (lakdya hanuman) शिवारात एका शेतामध्ये पुन्हा गांजाचे पिक आढळून आले असून, पोलिसांनी ते उध्वस्त केले आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात लाकडया हनुमान शिवारात रवी कालुसिंग पाडवी यांने शेतामध्ये प्रतिबंधित असलेला आणि मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा या अमली पदार्थाच्या झाडाची बेकायदेशीर लागवड केली असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (dhule crime branch) सोमवारी कारवाई केली. गांजा सदृश्य वनस्पतीच्या 285 रोपांची लागवड करण्यात आली होती. ही रोपे पोलिसांनी उपटली आहेत. सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी रवी काळूसिंग पाडवी (रा. लाकड्या हनुमान) याच्याविरुध्द शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सुर्यवंशी, संदीप पाटील, काॅन्स्टेबल संदीप सरग, सुरेश भालेराव, महेंद्र सपकाळ, जगदीश सुर्यवंशी, विनोद पाठक, योगेश साळवे, योगेश ठाकुर, चालक कैलास महाजन तसेच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संदीप ठाकरे, योगेश मोरे, संजय भोई, कृष्णा पावरा, रोहीदास पावरा, इसरार फारुखी, संतोष पाटील यांनी ही कारवाई केली.
भारतात गांजाचे सेवन करणे हा बऱ्याच ठिकाणी लोकपरंपरेचा भाग असला आणि ग्रामीण भागात गांजाचे सेवन सर्रास केले जात असले तरी गांजाचे सेवन करणे, लागवड करणे आणि त्याचा व्यापार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण गांजाला असलेली मोठी मागणी आणि चढ्या भावाने मिळणारी किंमत यामुळे धुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील आदिवासी शेतकरी मोठ्या प्रमाणात गांजाच्या शेतीकडे वळले आहेत.
गांजा शेतीसाठी सोयीचा प्रदेश
धुळे पोलीसांनी गेल्या दोन वर्षात गांजाच्या अवैध शेतीवर वेळोवेळी छापेमारी केली, तेव्हा त्यांना या गांजा शेतीचा एक विशिष्ट पॅटर्न आढळून आला. शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागात गांजाची शेती केली जाते. या भागात दुर्गमतेमुळे रस्ते नाहीत, जंगली प्रदेश, आदिवासी भाग, दुर्मीळ लोकसंख्येचा प्रदेश या सर्व कारणांमुळे इथपर्यंत सहसा कोणी पटकन पोचू शकत नाही आणि त्याचमुळे धुळ्यातला हा भाग गांजा शेतीसाठी सोयीचा बनला आहे.
अशी करतात गांजाची शेती
गांजाच्या रोपांची लागवड ही बाजरी, मका, कापूस या पीकांच्या मध्ये केली जाते. बाजरी किंवा मका यांच्या झाडांशी गांजाची झाडे मिळतीजुळती असल्याने लांबून बघितले असता या दोन पीकांमधला फरक पटकन कळून येत नाही. तसेच तुरीच्या पीकातसुध्दा गांजाच्या रोपांची लागवड केली जाते. दिवाळी संपली की रब्बी हंगामातल्या पीकांसोबतच गांजाच्या पीकांचा मोसम असतो. पावसाळ्यानंतर लावलेली रोपे 4 ते 6 महिन्यात हाताशी येतात आणि नंतर त्यांची तोडणी केली जाते आणि विक्रीला शहरांमध्ये पाठवली जातात. फेब्रुवारीनंतर या गांजाच्या पीकांचा हंगाम संपून जातो. तसेच गांजाच्या पीकाला पाणी कमी लागत असल्याने कोरडवाहू जमीनीवर गांजाची लागवड करणे सहज शक्य असते. त्यामुऴे धुळ्याच्या डोंगराळ भागात गांजाच्या लागवडीला पोषक अशी परिस्थिती आहे.
असा तयार होतो गांजा
गांजाची ओली रोपे तोडल्यानंतर त्यांना वाळवून त्यांची भुकटी केली जाते आणि ही वाळलेली पाने गांजा म्हणून विकली जातात. गांजाच्या हिरव्य़ा पाल्याचे रुपांतर हे ‘भांग’ य़ा अमली पदार्थात केले जाते. ही भांग आपल्याकडे महाशिवरात्री किंवा रंगपंचमीला सर्रास प्यायली जाते. गांजा बनवताना कोणतेही केमिकल्स वापरले जात नाही त्यामुळे गांजा उत्पादनाची प्रक्रिय़ा सोपी मानली जाते.
वन जमिनीवरही सर्रास पिकविला जातो गांजा
सातपुडा पर्वतरांगामधल्या या जमिनी वनखात्याच्या ताब्यात आहेत. या सरकारी जमिनीवर गांजाची शेती केली जाते. या जमिनीवर शेती केल्याने जमिनीच्या मालकाचे नाव कागदोपत्री पुढे येत नाही. त्यामुळे पोलिसांनी जरी छापेमारी केली तरी गुन्हा नोंदवताना अडचणी येतात. तसेच गांजा आणि तत्सम अंमली पदार्थांची माहिती सगळ्या शेतकऱ्यांना नाही. त्यात ही शेती करणे बेकायदेशीर आहे याबद्दलही अज्ञान आहे. त्यामुळे गांजाची लागवड सर्रास केली जाते.
गांजाचे दर असे
पोलिसांनी गांजा पकडल्यानंतर त्यांचे वर्गीकरण तयार गांजा माल आणि गांजाच्या वनस्पती असे केले जाते. बाजारभावानुसार गांजाच्या तयार मालाची किंमत ही शहरांमध्ये 10 ते 15 हजार किलो इतकी असते. त्यानुसार गांजाच्या झाडाची किंमत प्रती किलो 1 ते 2 हजार अशी लावली जाते. त्यामुळे जेव्हा गांजाचा मुद्देमाल पकडला जातो तेव्हा बाजारात चालू असलेल्या गांजाच्या किंमतीनुसार मुद्देमालाची किंमत ठरवली जाते. तसेच पोलीसांकडून वेगवेगळ्या ठिकाणी गांजाच्या किंमतीची माहिती घेतली जाते. तयार गांजाचे दर शहरानुसार वेगवेगळे आहेत. गांजा तस्करीतील साखळीत प्रत्येक टप्प्यावर त्याचे दर तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढतात. शहरातील अड्ड्यांवर किरकोळ विक्री करताना गांजाचे दर दुप्पट किंवा तिप्पट असतात.
पोलिसांच्या कारवायाही मोठ्या
धुळे जिल्हातील या परिस्थितीचा सखोल अभ्यास करुन धुऴे पोलीसांकडून गांजा शेतीची त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती घेऊन हे रॅकेट उद्धस्त करण्याचे कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गाव पातळीवर ग्रामसभा घेऊन जनजागृती तर केली जात आहेच पण गेल्या दोन वर्षात धुळे पोलीसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. गांजा शेतीसंदर्भात 50 पेक्षा अधिक गुन्हे नोंदवले आहेत तर 70 पेक्षा अधिक आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत पाच कोटींपेक्षा अधिक आहे. यातील अनेक कारवायांमध्ये गांजा बेवारस आढळून आला असून, अजुनही मालकांचा शोध लागलेला नाही. पोलिसांच्या एवढ्या कारवाया होऊनसुध्दा हा धंदा सुरुच आहे. त्यामुळे पोलिसांनी आपले नेटवर्क आणखी स्ट्राॅंग करण्याची गरज आहे.
– ईश्वर बोरसे, शिरपूर