…तर मोबाईलचे काय झाले असते?
एखाद्या अप्राणिक व्यक्तीला किंवा आय फोनची हौस आहे आणि तो घेण्यासाठी पैसे नाहीत अशा हौशी तरुणाला मोबाईल सापडला असता तर तो रिचाला कधीच परत मिळाला नसता. मोबाईलच्या सुरक्षिततेसाठी कंपन्यांनी ट्रॅकर वगैरे अॅक्टीव्ह करण्याची सुविधा दिली असली तरी केवळ पाचशे रुपये खर्च केले तरी मोबाईल कायमस्वरुपी ताब्यात ठेवता येतो. हॅकर काहिही करु शकतात हे पोलिसांना माहित आहे. परंतु जगात आजही काही चांगली माणसं आहेत की जी कधीच कोणाच नुकसान करत नाहीत. अहंकारातही नाही, लालसेपोटीही नाही आणि कुणाच्या आहारी जाऊन तर मुळीच नाही. म्हणूनच माणुसकी जपणार्या अशा लोकांमुळे विश्वास कायम आहे आणि जग विश्वासावरच चालते आहे…
धुळे वन विभागात प्रामाणिकपणे सेवा बजावणारे धम्मपाल निकम ऊर्फ डी. के. भाई यांच्या प्रामाणिकपणाचा आणखी एक प्रत्यय आला.
सन 2023 च्या फेब्रुवारी महिन्यातील 17 तारखेची धुळे शहरातील साक्री रोडवरील ही गोष्ट आहे. अभियांञिकीचे शिक्षण घेणार्या एका मुलीचा तब्बल दीड लाख रुपये किमतीचा अॅपल आय फोन (Apple I Phone) रस्त्यावर पडला. त्याचवेळी साक्री रोडने ड्युटीवर जाणारे वन कर्मचारी डी. के. भाई निकम यांना तो सापडला. हा महागडा मोबाईल कोणाचा याचा शोध त्यांनी त्या परिसरात घेतला पण मोबाईलचा मालक काही सापडला नाही. त्यातल्या त्यात मोबाईल लाॅक असल्याने त्यात सेव्ह असलेल्या एखाद्या क्रमांकावर संपर्क करणेही शक्य नव्हते. सुदैवाने काही वेळाने त्या मोबाईलवर एका मुलीचा फोन आला. काॅल रिसीव्ह केल्यावर तिकडून एक मुलगी रडक्या आवाजात बोलत होती. हा मोबाईल फोन माझा आहे? हरवला आहे, असे तिने सांगितले. तसेच आपण कोण?अशी विचारणा तिने केली तेव्हा डी. के. भाई निकम यांनी आपला परिचय करुन देत, ञास करुन घेऊ नकोस, तुझा मोबाईल सुरक्षित असून तो तुला परत मिळेल, अशा शब्दात दिलासा दिला. आपण कोण?, आपले नाव काय? अशी सहानुभूतीपूर्वक विचारणा केल्यावर मुलीने तिचे नाव रिचा सुरेश अहिरे, डिप्लोमा इंजिनिअरींग सेकंड ईअर स्टुडंट्स आहे, असे सांगितले. तसेच ती ज्या ठिकाणी थांबली होती त्या ठिकाणचा पत्ताही तिने दिला. डी. के. भाई यांनी त्वरीत त्या ठिकाणी जाऊन रिचाला तिचा मोबाईल दिला. तिने मोबाईलचे लाॅक उघडल्यावर मोबाईल तिचाच असल्याची खाञीही पटली. सदर मुलीने तिच्या मोबाईलवरून तिच्या वडिलांना व मामांना बोलाऊन घेतले. मोबाईल परत मिळाल्याने रिचा ढसाढसा रडली. कारण मोबाईल हरवला त्यावेळी तिला असे वाटले होते की, इतका महागडा मोबाईल ज्याला सापडेल त्याच्याकडून परत मिळेलच असे नाही. घरचे रागावतील म्हणूनही ती घाबरलेली होती. पण मोबाईल परत मिळाल्याने ती भाऊक झाली होती आणि तिचे अश्रू थांबत नव्हते. तिच्या पालकांनी डी. के.भाई निकम यांचे मनापासून आभार मानले व माणुसकीचे जिवंत उदाहरण बघुन त्यांचेही डोळे पाणावले. परिसरातील लोकं सर्व घटना पहात होते व डी. के. भाई निकम यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत होते.
डी. के. भाईंच्या माणुसकीचा अनुभव कोरोना काळातही आला होता. धम्ममित्र डी. के. भाईंनी स्वखर्चाने गरीब, गरजूंना मास्क, सॅनिटायझर, अन्नदान केले होते. म्हणून त्यांना “कोरोना योध्दा” पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. वन विभागात कार्यरत आहेत म्हणूनच नव्हे तर मुळातच पर्यावरण प्रेमी असलेल्या डी. के. भाईंना वृक्ष लागवडीचा आणि संवर्धनाचा छंद आहे. वाढदिवस असो की नवीन वर्षाचे स्वागत, सण उत्सवांचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करतात. धम्ममित्र डी. के. भाई सामाजिक उपक्रमातही नेहमीच अग्रेसर असतात. तरीही ते प्रसिध्दीपासून लांब राहतात.