Huge cache of arms seized at MP border, 10 drug smugglers arrested एमपी बाॅर्डरवर मोठा शस्ञसाठा पकडला, धुळ्याच्या दहा तस्करांना अटक
#dhule crime धुळेः राजस्थान राज्यातून शस्ञास्ञांची तस्करी करणारे वाहन पोलिसांनी एमपी बाॅर्डरवर पकडले असून, धुळ्याच्या दहा संशयित तस्करांना अटक केली आहे.
शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर (#hadakhed chekpost) सापळा लाउन पांढऱ्या रंगाच्या ईरटीका गाडी मधून होणारी धारदार शस्त्रांची वाहतूक रोखली. या कारवाईत पोलिसांनी 12 तलवारींसह इतर शस्ञे आणि एक मारुती कंपनीची ईरटीका गाडी असा सुमारे 6 लाख 29 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही धारदार शस्त्रे राजस्थान राज्यातून महाराष्ट्रात आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांना याबाबत टिप मिळाली होती. पांढऱ्या रंगाच्या ईरटीका गाडी क्रमांक MH 04 FZ 2004 मधून काही इसम इंदूरमार्गे धुळ्याकडे घातक हत्यारे घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्यासह पथकाने हाडाखेड सीमा तपासणी नाका येथे नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरु केली. त्यावेळी या वाहनात 12 तलवारी, दोन गुप्ती, एक चाॅपर, एक बटनाचा चाकू, दोन फाईट असा शस्त्रसाठा मिळून आला.
याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसांनी सतपाल गिरधर सोनवणे, किरण नंदलाल दुधेकर, विकास देवा ठाकरे, सखाराम रामा पवार, सचिन राजेंद्र सोनवणे, राजू अशोक पवार, विशाल विजय ठाकरे, संतोष नामदेव पाटील, अमोल शांताराम चव्हाण, विठ्ठल सोनवणे (सर्व राहणार धुळे शहर, तालुका) आरोपींना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सोनगीरजवळ तब्बल 90 तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या. या तलवारी नेमक्या कुठून आणि कोणत्या उद्देशाने आणल्या जातात याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.