बोपखेलच्या ग्रामसेविका सुनीता अहिरे यांच्यासह 32 ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
धुळे : उत्कृष्ट ग्रामसेवा बजावणाऱ्या 32 ग्रामसेवकांना जिल्हा परिषद प्रशासनाने आदर्श पुरस्कार बहाल करून प्रोत्साहन दिले. उत्कृष्ट ग्रामविकास आणि ग्रामसेवा केल्याबद्दल बोपखेल ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुनीता अहिरे यांनाही आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले. सर्व ग्रामसेवकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याने आपली जबाबदारी वाढली असल्याची प्रतिक्रिया सुनीता अहिरे यांनी दिली.
ग्रामिण विकासातील मुख्य भाग म्हणुन ग्रामसेवक अत्यंत महत्वाचा घटक आहे. ग्रामीण विकासाचा पहिला आणि शेवटचा कणा हा ग्रामसेवकच आहे. त्यामुळे ग्रामसेवकांची भुमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी केले.

जिल्हा परिषदेश ग्रामपंचायत विभागाच्या वतीने ग्रामसेवक व ग्राम विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात येणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पाटील, आरोग्य सभापती महाविरसिंग रावल, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकुर आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी सांगीतले की, जिल्ह्यात ग्रामसेवकांचे काम उत्कृष्ट आहे. ग्रामसेवकांना प्रोत्साहनासाठी देण्यात येणारे पुरस्कार काही कारणास्तव रखडले होते. ते मार्गी लावण्यात आले आहेत. आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासोबतच उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी यापुढे अजुन पुरस्कारांची संख्या वाढविण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे यांनी केले. २०१५ ते २०२५ अशा आठ वर्षातील निवड झालेल्या ३२ ग्रामसेवकांना गौरविण्यात आहे.
पुरस्काराचे मानकरी ग्रामसेवक असे
आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी सन २०१५-१६ साठी सुनील देसले (मोराणे प्र.ल.), गौरी बेहरे (चिरणे), इंदिरा पावरा (जामन्यापाडा), मनिषा बोरसे (विरखेल). २०१६-१७ साठी प्रफुल्लकुमार शिंदे (कोळदे/ब्राह्मणे), योगेश अहिरराव (बाळदे), सुमित्रा राऊत (खरगाव), चेतनकुमार पाटील (वडगाव). २०१७-१८ साठी प्रदीप सोनवणे (नावरा), शरद कोळी (परसामळ), हेमंत सोनार (हिवरखेडा), रुपाली देवरे (मलांजण). २०१८-१९ साठी आबा पवार (बोरकुंड), भटेसिंग परमार (नवेकोडदे), शिलतकुमार चौरे (मैंदाणे), दौलत नेरे (वनावल). २०१९-२० साठी महेश गिरासे (उंटावद), संदीप देवरे (सार्वे), जितेंद्र भामरे (चिंचवार), एन. वाय. कुवर (इंदवे). २०२०-२१ साठी नागराज पाटील (दत्ताणे), ज्ञानेश्वर तिरमले (गुऱ्हाळपाणी/उप्परपिंड), चत्रू पवार (चांदे), गणेश कोकणी (पारगाव). २०२१-२२ साठी प्रवीणसिंग गिरासे (तावखेडा), अमित भामरे (मेहेरगाव), सुनिता अहिरे (बोपखेल), जितेंद्र पावरा (बुडकी) तर २०२२-२३ साठी भाऊसाहेब पाटील (लळींग), बापु पवार (धनेर), जयश्री पाटील (डोंगरगाव), गोरख सोनवणे (सुळे) यांचा गौरव करण्यात आला.













