An attempt to grab an elderly ex-serviceman’s farm
वयोवृद्ध माजी सैनिकाची शेती बळकावण्याचा प्रयत्न
Dhule News धुळे: तालुक्यातील कापडणे येथे वयोवृद्ध माजी सैनिक श्रीराम वामन पाटील यांची शेतजमीन बळकावण्यासाठी भाऊबंदकीतील लोक त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण, दमदाटी करीत आहेत, अशी माहिती त्यांनी मंगळवारी धुळ्यात पत्रकार परिषदेत दिली.
कापडणे शिवारात गट क्रमांक १२६५ ही शेती त्यांनी १९७४ मध्ये खरेदी केली होती. त्या काळात ग्रामीण भागात प्रचलित पद्धतीनुसार त्यांनी स्टॅम्प पेपरवर खरेदीचा व्यवहार केला होता. परंतु ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात जाऊन त्यांनी उताऱ्यावर नाव लावले नाही. त्यामुळे पूर्वीच्याच मालकाचे नाव उताऱ्यावर कायम राहीले. परंतु हा व्यवहार झाल्यापासून श्रीराम पाटील आणि त्यांचे कुटुंबीयांच्या ताब्यात शेती असून तेच शेती करीत आहेत. परंतु हिरामण चैत्राम पाटील, मनोज आणि गणेश हिरामण पाटील हे तिघे शेती बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मारहाण, दमदाटी करतात. वेळोवेळी पिकांचे नुकसान करतात. शेतीचे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण त्रास देणाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि उताऱ्यावर नाव लावावे, अशी मागणी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.













