मुस्लीम समाजाला गुरे पाळण्याची बंदी आहे का?
धुळे : मुस्लीम समाजाला गुरे पाळण्याची बंदी आहे का? असा प्रश्न उपस्थित करत, पोलिसांनी आमची गुरे पळवून नेल्याचा खळबळजनक आरोप जाकीर शाह गुलाब शाह यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
गुंडगिरी, दादागिरी आणि बळाचा वापर करुन पोलिसांनी गायींसह २३ गोर्हे आणि रोकड हिसकावून नेल्याचा गंभीर आरोप जाकीर शाह गुलाब शाह यांनी केला. याप्रकरणी त्यांनी पोलीस अधिक्षकांकडे तक्रारही केली आहे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साक्री रोडवरील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत जाकीर आणि रफिक शाह म्हणाले की, कत्तलीसाठी गुरे कोंबल्याच्या संशयावरुन पोलिसांनी वडजाई रोडवरील आमच्या गोठ्यात येवून २३ गुरे आयशरमध्ये बळजबरीने भरुन तसेच व्यवसायाचे पैसे हिसकावून नेले. पोलिसांनी २ लाख रुपयाच्या लाचेची मागणीही केली. तीन जून रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या मालकीच्या जागेत गुरे-ढोरे आणि शेळ्या पालन करीत आहोत. मार्केटमधून खरेदी-विक्री केलेल्या गुरांच्या पावत्याही त्यांनी पोलिसांना दाखविल्या. परंतु उपयोग झाला नाही. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, याप्रकरणी आम्ही जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. त्यांनी चौकशी करुन कारवाईचे आश्वासन दिल्याचे जाकीर आणि रफिक शाह यांनी म्हटले आहे.















