धुळ्याच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची अहमदनगरला बदली
धुळे : येथील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, आझादनगरचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि देवपूरचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर या तीन अधिकाऱ्यांची अहमदनगरला बदली करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी 13 जानेवारी रोजी बदलीचे आदेश दिले आहेत. मध्यरात्रीनंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशान्वये लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीच्या आदेशान्वये पोलीस अधिकाऱ्यांनी धुळे जिल्ह्यातील शासकीय शस्त्र, दारुगोळा, ओळखपत्र, शासकीय निवासस्थान स्थगित वीज बिल भरणा करून पोलीस मुख्यालय धुळे येथे जमा करावे. तसेच आपल्याकडील पोलीस ठाण्याचा कार्यभार इतर पोलीस अधिकाऱ्यांकडे प्रशासकीय कागदपत्रांसह सोपवावा, असेही आदेशात म्हटले आहे.
तीनही पोलीस ठाण्यांचा अतिरिक्त कार्यभार यांच्याकडे : आझादनगर पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार याच पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांना देण्यात आला आहे. तर धुळे शहर पोलीस स्टेशनचा अतिरिक्त कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक शकील रशीद शेख यांना सोपविण्यात आला आहे. देवपूर पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील यांना दिला आहे.















