मुबलक अन्नधान्यासाठी सातपुड्यात होते ‘कणीमाता आठीवटी’ पूजा
अक्कलकुवा : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात सध्या आदिवासी कुटुंबांमध्ये कणीमातेच्या आठीवटी पूजेची रेलचेल आहे. यानिमित्त आदिवासी बांधव एकमेकांकडे जाऊन पूजा करतात आणि पाहुणचारही घेतात.

मुबलक अन्नधान्यासाठी कणीमाता आठीवटी पूजन श्रद्धा व भक्तिभावाने करण्यात येत आहे. धडगाव तालुक्यातील अस्तंबा ऋषींच्या यात्रेनंतर सातपुड्यातील आदिवासी बांधव आठीवटी या अन्नधान्याच्या पारंपरिक पूजेला श्रद्धा व भक्तिभावाने सुरुवात करतात. सातपुड्यात दिवाळीच्या कालावधीनंतर होणाऱ्या अन्नधान्याच्या आठीवटी पूजेला सुरूवात झाली आहे. या पूजेला येथील भाषेत ‘आठीवटी’ असे म्हटले जाते. कणीमातेची नवीन अन्नधान्याची पूजा होऊन मुबलक अन्नधान्य पुरावे, अशी प्रार्थना करण्यात येत आहे. सातपुड्यातील डोंगरदऱ्यात राहणारा आदिवासी बांधव आपल्या शेतातील पीक पेरणीपासून त्याची काढणी होऊन सेवन होईपर्यंत विविध पूजा या अन्नधान्यासाठी करतात. अस्तंबाच्या शिखरावरून उतरल्यानंतर आपापल्या सवडीनुसार हे बांधव आठीवटी या पूजेसाठी कुटुंबात तयारी सुरू करतात. गावातील सर्व मंडळींच्या सोयीनुसार हा पूजाविधी होतो. ही पूजा रात्रीच्या वेळी केली जात असून, एका घरातील नवीन अन्नधान्य पूजेसाठी प्रथम घरातील प्रमुख व्यक्तीला पालनी करावी लागते. ती पाच ते सात दिवसांची असते. ही पूजा गावातील प्रमुख पुजाऱ्याकडून करण्यात येते.

अशी केली जाते पूजा : आठीवटी पूजेत प्रामुख्याने साळ (तांदूळ), मोठी कणगी (ज्वारी), मोठी भेंडी, अस्तंबा यात्रेवरुन आणले जाणारे रोषा हे सुगंधित गवत, मुसड, सूप, फुलहार, महूची डोवी, बेलाची पाने, सुटे पैसे, बोत, नारळ, दिवा या सांसारिक उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंची पूजा घरातील आरोग्य, धन, संपत्ती, पशुधन, अन्नधान्य पुरेसे वर्षभर लाभो यासाठी ही पूजा करण्यात येते. पूजेसाठी कुव्यातील, नदीतील नवीन पाणी सोबत ठेवून पूजेसाठी बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात धुऊन हातात बेलपाने व डोवीतील फुलहार घेऊन पाती घ्यावी लागते. अशी पाच किंवा सात जणांची पूजा झाल्यावर देवपूजा संपल्यावर देवाला व धरतीमातेला वंदन केले जाते. यासाठी आलेल्या सर्व व्यक्तींना प्रसाद म्हणून जेवण दिले जाते. अशा पद्धतीने आठीवटी ही पारंपरिक पूजा करण्यात येते.
अक्कलकुवा तालुक्यात सातपुड्यातील अतिदुर्गम भागात ओघानी पाड्यात दिलवरसिंग वसावे याच्या घरात नुकताच पूजाविधी पार पडला. आदिवासी बांधवांच्या आध्यात्मिक गुरूंनी याविषयी अधिक माहिती दिली.

काय आहे आठीवटी आणि नवाय पूजा : सातपुड्यात निसर्ग देवतेसाठी अनेक पू्जाविधी केल्या जातात. त्यातील आठीवटी अत्यंत महत्त्वाची पूजा आहे. ही पूजा कणीमातेसाठी केली जाते. ही पूजा प्रत्येक घरी केली जाते. नवाय व आठीवटी या दोन महत्वाच्या पूजा आहेत. नवाय ही पूजा दसरा होण्यापूर्वी आणि आठीवटी पूजा त्यानंतर केली जाते. नवाय म्हणजे शेतीतील नवीन भाजी व अन्नधान्याचे सेवन करण्यापूर्वी करण्यात येणारी पूजा होय. धडगाव व मोलगी परिसरात याच पूजाविधीचा सूर सर्वत्र घुमत आहे.
हेही वाचा













