ॲड. महेंद्र भावसार यांचा अजित पवार गटाकडून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज
नाशिक Nashik Division Teachers Constituency Election : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी धुळ्याचे ॲड. महेंद्र भावसार यांनी बुधवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. एक अपक्ष आणि एक अर्ज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दाखल केला. विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ॲड. महेंद्र भावसार हे गेल्या 34 वर्षांपासून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. शिक्षकांविषयी असलेल्या कायद्याचा दांडगा अनुभव आणि शेकडो शिक्षकांना त्यांनी कोणताही मोबदला न घेता केलेली मदत त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरत आहे. अतिशय संवेदनशील व प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून एडवोकेट महेंद्र भावसार यांची शिक्षण व वकील क्षेत्रामध्ये ओळख आहे.
संस्थाचालकांकडून शिक्षकांवर केल्या जाणारे अत्याचार व मनमानी कारभारामुळे त्रस्त असलेल्या शेकडो शिक्षकांना त्यांनी आजवर न्याय मिळवून दिला आहे. इतकेच नाही तर ऐतिहासिक असे अनेक निकालही महेंद्र भावसार यांनी लढवल्येल्या केसेस मध्ये लागले आहेत. त्यांचा शिक्षकांसदर्भातील कायद्याचा सखोल अभ्यास आणि शिक्षकांचा आग्रह लक्षात घेता भावसार यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, बुधवारी महेंद्र भावसार यांनी दोन अर्ज सादर केले असून, यात अपक्ष अर्ज सादर करत असताना सोशल अँड कल्चरल असोसिएशन कुसुंबाचे चेअरमन अनिल चौधरी, भावसार बहुउद्देशीय संस्था नाशिकचे अध्यक्ष डॉ. सुनील भावसार, गुरुदत्त माध्यमिक विद्यालय म्हसाळेचे सचिव सुनील देवराम बागुल, निवृत्त कृषी अधिकारी अमृत पवार, आसिफ जवाहर, सुरेंद्र भावसार, ॲड. सागर जैन उपस्थित होते.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून फॉर्म सादर करत असताना प्रवीण नेरपगार, स्वामी विवेकानंद संस्था पारोळा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक दयाराम पाटील, महेंद्र भावसार यांचे सहकारी आणि असिस्टंट प्रवीण हिम्मतराव पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्ज सादर केला आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे उमेदवारीची मागणी ॲड. भावसार यांनी केली आहे जर पक्षाकडून त्यांना तिकीट दिले जाण्याच्या चर्चा असल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ॲड. भावसार यांना उमेदवारी मिळाल्यास ॲड. भावसार यांची ताकद आणखीनच वाढणार आहे.
मी आज अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज सादर केला असून असंख्य शिक्षकांचा मला पाठिंबा असल्यामुळे ही निवडणूक मी नक्की जिंकेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. – ॲड. महेंद्र भावसार, उमेदवार














