Rajarshi Shahu Maharaj Senior Literary, Artist Honorary
kalakar mandhan yojana ज्येष्ठ कलावंतांनी मानधन योजनेचा लाभ घ्यावा!
Dhule News धुळे : शासनाच्या सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, पर्यटन विशेष सहाय्यक विभागातर्फे राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन याेजना राबविली जाते. त्यासाठी जिल्हास्तरीय समिती पालकमंत्र्यांच्या समंतीने मंजुर करण्यात आली आहे. या याेजनेचा लाभ जिल्ह्यातील ३७२ कलावंत घेत आहेत. याेजनेच्या मानधनातही दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. गरजवंत साहित्यिक, कलावंतांनी याेजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मानधन याेजना जिल्हा समितीचे अध्यक्ष पारिजात चव्हाण यांनी केले.
राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन याेजनेचा लाभ जास्तीत जास्त कलावंतांना मिळावा यासाठी समितीतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी समितीचे उपाध्यक्ष शाहिर श्रावण वाणी, सदस्य जगदीश देवपूरकर, पपीता यादवराव जाेशी आदी उपस्थित हाेते. पारिजात चव्हाण, श्रावण वाणी यांनी याेजनेबाबत माहिती दिली.
राज्यातील वृध्द साहित्यिक, कलावंत यांना मानधन देण्याची याेजना १९५४-५५ पासून सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातून शंभर कलावंत, साहित्यिकांची निवड हाेते. त्यात संबंधित कलावंत हा ५० वर्षापेक्षा अधिक वयाचा असावा, त्याचे राज्यात १५ वर्षापेक्षा अधिकचे वास्तव्य असावे, त्याचे वार्षिक उत्पन्न ४८ हजाराच्या आत असावे व त्याचा उदरनिर्वार हा केवळ कलेवर अवलंबून असावा, अशांना याजेनाचा लाभ मिळताे. तसेच त्याने शासनाच्या अन्य काेणत्याही याेजनेचा लाभ घेतलेला नसावा. काेवीडमुळे २०१९ ते २०२२ या काळातील एकूण ७५९ प्रस्ताव मंजुरीसाठी प्रतिक्षेत आहेत. त्यातील ३०० प्रस्ताव मंजुर करण्यात येणार आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समिती, तहसील कार्यालय किंवा समाजकल्याण विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी काेणत्याही प्रकारचे शुल्क लागत नाही. शासनाच्या निकषानुसार निवड समितीतर्फे खऱ्या कलावंत किंवा साहित्यिक यांची निवड केली जाते. तसेच अर्ज सादर करणाऱ्यांना आपली कला समितीसमाेर सादर करावी लागते. ही चाचणी इन कॅमेरा हाेते. जेणेकरून खऱ्या कलावंतांवर अन्याय हाेवू नये हा त्यामागे हेतू आहे. याेजनेत पात्र असणाऱ्यांना मानधन मिळवून देण्यासाठी समिती प्रयत्न करणार आहे. यासाठी वयाेवृध्द साहित्यिक, कलावंत यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
मानधनात वाढ
मानधन देण्यासाठी साहित्यिक, कलावंत यांची तीन प्रकारात वर्गवारी करण्यात येते. त्यात राष्ट्रीय पातळीवर याेगदान देणारे साहित्यिक, कलावंत यांना अ वर्गाचा दर्जा देवून त्यांना पूर्वी १ हजार ४०० रूपये मानधन मिळत हाेते. त्यात वाढ करून आता २ हजार ७५० रूपये दरमाह मानधन दिले जाते. तर राज्य पातळीवरील वृध्द कलावंतांना ब वर्गाचा दर्जा देवून त्यांना १ हजार २०० ऐवजी आता २ हजार ५५० रूपये आणि जिल्हास्तरावर याेगदान देणाऱ्या कलावंतांना १ हजाराऐवजी २ हजार २५० रूपये मानधन याेजनेतून दिले जातात, अशी माहिती याप्रसंगी शाहिर श्रावण वाणी यांनी दिली.













