थर्टी फर्स्टला चौफेर नाकाबंदी, दोन पिस्तूल, लाखोंचा गुटखा जप्त
धुळे : थर्टी फर्स्टच्या सेलीब्रेशनला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून जिल्हा पोलिस दलाने संपूर्ण रात्र जागुन काढली. जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह ४० पोलिस अधिकारी, १७८ पोलिस अंमलदारांच्या फौजफाट्याने जिल्ह्यातील ३३ ठिकाणी असामाजीक तत्वांची नाकाबंदी केली. या नाकाबंदीत पोलिसांनी सुमारे साडेबारा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

३३ ठिकाणी केेलेल्या नाकाबंदीत ७२४ चार चाकी आणि ४७३ दुचाकी वाहनांची पोलिसांनी तपासणी केली. ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या ९१ केसेस केल्या. मोटर वाहन काद्याचा वापर करत ११७ केसेस करुन सुमारे ५० हजार रुपयांचा दंड वाहन धारकांना ठोठावला. शिरपूर शहर पोलिसांनी केेलेल्या नाकाबंदीत ५ जीवंत काडतुसांसह दोन गावठी पिस्तल जप्त करण्यात आल्या आहेत. ७५ हजारांचा मुद्देमाल शिरपूर पोलिसांनी जप्त केला आहे. दारुबंदी कायद्यान्वये ९९ केसेस करुन १ लाख ६१ हजार ३२५ रुपयांची दारु ताब्यात घेतली. जुगारींना देखील पोलिसांनी दणका दिला आहे. जुगार कायद्यान्वये १९ केसेस करुन रोकड आणि जुगाराचे साहित्य असा ११ हजार ७० रुपयांचा ऐवज जप्त केला. सोनगीर पोलिसांनी २ लाख २४ हजार ६४० रुपयांचा गुटखा जप्त केला. सोनगीर पोलिसांनी गुटख्याची वाहतुक करणारी ८ लाख रुपये किंमतीची आयशर वाहने ताब्यात घेतली.
रात्रभरातून एकूण ३२८ कायदेशीर कारवाया करुन १२ लाख ५४ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या नाकाबंदी ऑपरेशन दरम्यान पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी, डीवायएसपी साजन सोनवणे यांनी ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह आणि नाकाबंदी ठिकाणी गस्त घालुन तपासणी केली.
सव्वा दोन लाखांचा गुटखा पकडला, दोन जणांना अटक
मुंबई-आग्रा महामार्गावरून इंदूर येथून कोल्हापूरकडे होणारी गुटख्याची तस्करी पोलिसांनी रोखली. वाघाडी शिवारात आयशरला पकडण्यात आले. सव्वा दोन लाखांची राजु इलायची सुपारी व ८ लाखांचा ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालकासह दोघांना अटक करण्यात आली असून सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई दि. ३० रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास करण्यात आली. सोनगीर पोलिसांनी वाघाडी शिवारातील हॉटेल निवांत समोर एमपी ०९ जीएफ ४४३३ क्रमांकाच्या ट्रकला पकडले. ट्रकची तपासणी केली असता त्यात राज्यात प्रतिबंधीत राजु इलायची सुपारीचे ३ हजार ७४४ पाकीटे मिळून आली. २ लाख २४ हजार ६४० रूपयांची सुपारी व ८ लाखांचा ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच ट्रक चालक तसलीम निसार खान ( वय ४१ रा. केसबर्डी, महु जि. इंदूर) व क्लिनर राजेश बलराम डावर (वय ४३ रा. राजपुर कोटी, महु) या दोघांना अटक करण्यात आली. याबाबत पोना अमरिश सापन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय विजय चौरे करीत आहेत.
दोन कट्टे, ५ काडतूसह राजस्थानच्या तरूणाला बेड्या
नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला शहरात घातपाताचा डाव पोलिसांनी उधळून लावला. गुजराथी कॉम्प्लेक्सनजीक दोन गावठी कट्टे व ५ जिवंत काडतूसह आलेल्या राजस्थानच्या तरूणाला शहर पोलिसांनी शिताफिने जेरबंद केले. त्यांच्याकडून ७० हजारांचा वरील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कट्टे सोबत बाळगून त्याचा कोणाचा घातपात करण्याचा अगर आणखी कुठला इरादा होता का, याचा पोलिस शोध घेत आहेत.

शिरपूर शहरात एस.टी.स्टँडकडुन गुजराथी कॉम्प्लेक्सकडे एक जण पायी चालत येत असुन त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा असल्याची खात्रीशिर माहिती काल सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना मिळाली.त्यांनी तत्काळ पथक तयार करुन कारवाईसाठी रवाना केले. पथकाने गुजराथी कॉम्प्लेक्स येथे सापळा लावून एस.टी.स्टँड कडुन गुजराथी कॉम्प्लेक्सडे पायी चालत येणार्या एकाला पकडले. त्याने त्याचे नाव प्रयागसिंह देविसिंग जोधा (वय २७ रा.भुरुजगड ता. फलसुंड जि.जैसलमेर, राजस्थान) असे सांगितले. त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यात दोन गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुस व एक मोबाईल मिळुन आला. ५० हजारांचे दोन गावठी कट्टे, ५ हजारांच्या पाच जिवंत काडतुस व २० हजाराचा मोबाईल असा एकुण ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोकाँ विवेकानंद जाधव यांच्या फिर्यादीवरून प्रयागसिंह याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अन्साराम आगकर, पोसई गणेश कुटे, संदिप मुरकुटे, संदिप दरवडे, पोना.राजेंद्र रोकडे, पोकॉ. दीपक खैरनार, विवेकानंद जाधव, भुपेश गांगुर्डे व विजय पाटील यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोसई संदिप दरवडे हे करत आहेत.
पहिले लग्न लपवून फसवणूक, वरासह चौघांवर गुन्हा दाखल
धुळे : पहिले लग्न लपवून दुसरा विवाह ठरवून फसवणूक करणार्या वरासह चौघांवर आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भारती नारायण पिंगळकर (वय ४१ रा. श्रीरंग कॉलनी, देवपूर) यांच्या फिर्यादीनुसार, गोकुळ किशोर विसपुते याने त्याचे पहिले लग्न झालेले असतांना त्याबाबत काही न सांगता त्यांच्यासह त्याचे वडील किशोर विसपुते, आई अनिता विसपुते, काकु अंजना विसपुते यांनी मुलीशी लग्न जुळविले. लग्नापोटी ५० हजार रूपये घेवून फसवणूक केली. हा प्रकार काल दि.३१ रोजी दुपारी शहरातील सुवर्णकार मंगल कार्यालयात घडला. याप्रकरणी वरील चौघांवर भादंवि कलम ४२०, ४१७, ४९५, ३२०, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा













