महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचाराचा झंजावात
धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघातील इंडिया आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, धुळे शहरातील विविध भागात त्यांच्या प्रचाराचा झंजावात सुरू आहे. शुक्रवारी सकाळी डॉ. शोभा बच्छाव यांनी साक्री रोडवरील विविध भागांमध्ये प्रचार फेरी काढली. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या सुकन्या मयुरी बच्छाव यांनी मील परिसरात प्रचार फेरी काढून काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याच आवाहन केलं.
शहरातील अत्यंत जिवाळ्याचा पाणीप्रश्नासह भुयारी गटारी आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यावर आपला भर राहील, असे आश्वासन धुळे लोकसभा मतदार संघाच्या इंडिया व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी दिले. धुळे शहरातील साक्री रोडवरील मोगलाई नेहरू चौकातून शुक्रवारी डॉ. बच्छाव यांनी प्रचार रॅलीला सुरूवात केली. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉ. सुशील महाजन, धीरज पाटील, नरेंद्र परदेशी, मोहनसिंग तनवाणी, संदीप सूर्यवंशी, बन्सी वाडीले, भरत मोरे, माधव गवळी, पिनू सुर्यवंशी, प्रशांत श्रीखंडे, दीपक देवरे, दीपक पाटील, वर्षा पाटील, बानुबाई शिरसाट, राजेंद्र खैरनार, रमू साबळे, मयूर गवळी आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. बच्छाव यांनी मतदारांच्या गाठीभेठी घेत त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना डॉ. बच्छाव म्हणाल्या की, गेल्या तीन दिवसांपासून धुळ्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रचाराचा झंझावात सुरू असून, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. धुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, प्रामुख्याने समोर आला असून, रस्तेही माॅडेल रोड होणे आवश्यक आहे. याबरोबरच भुयारी गटार योजना राबविणे गरजेचे आहे. तसेच शहरातील सुरत बायपासवरील हिरे शासकीय वैद्यकीय हाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालतही अनेक प्रश्न आहेत. तेथील सिटीस्कॅन मशीन बंद असून, त्यासाठी 8 कोटी 7 लाखांचा निधीही मंजुर झाला होता. परंतू टेंडर न निघाल्याने हा निधी परत गेला . येथे रूग्णवाहिकेचीदेखील सोय नाही. वास्तविक दहा वर्षापासून भाजपचे खासदार असून ते स्वत: डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज होती, असे त्या म्हणाल्या.
धुळ्यात बेरोजगारीची समस्याही मोठी असून, एमआयडीसीत नवीन उद्योग आणून रोजगार देण्याचा प्रयत्न राहील, असेही डॉ. शोभा बच्छाव यावेळी म्हणाल्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर हे देखील पुन्हा सक्रीय झाले असून, कालच त्यांच्यासोबत आम्ही वालखेडा येथे मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. उद्यापासून तीन दिवस शिंदखेडा दौरा असून, त्याचे नियोजन शामकांत सनेर यांनी केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा
महाविकास आघाडीतर्फे डॉ. शोभाताई बच्छाव यांचा उमेदवारी अर्ज दाखल