शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप
#Dhule धुळेः नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झालेल्या पशुधनाच्या मालकाला किंवा शेतकऱ्याला महसूल विभागाच्यावतीने आर्थिक मदत देण्यात येते. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून आमदार कुणाल पाटील (mla kunal patil) यांनी पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी एकूण 1 लाख 75 हजार रुपयांची आर्थिक मदत धनादेशाव्दारे देण्यात आली.
पावसाळ्यात किंवा अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे तसेच वीज कोसळून शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट ओढावत असते. या नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांचे पशुधन असलेले गाय, म्हैस, बैल यांचाही मृत्यू होत असतो. अशा नैसर्गिक संकटात मृत्यू झालेल्या जनावरांची नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्याला महसूल विभाग, तहसील कार्यालयामार्फत आर्थिक मदत देण्यात येत असते.
धुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी म्हणून आमदार कुणाल पाटील यांनी शासन पातळीवर वेळोवेळी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील पशुधन मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून नुकतीच आर्थिक मदत म्हणून धनादेशाचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील सहा शेतकऱ्यांना एकूण एक लाख 75 हजार रुपये मदतीचे धनादेश आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते नुकतेच सुपूर्द करण्यात आले. त्यात नांद्रे, निमगुळ, निमडाळे, सावळीतांडा येथील शेतकऱ्यांचा समावेश होता.
यावेळी आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉक्टर दरबारसिंग गिरासे, माजी पंचायत समिती सभापती बाजीराव पाटील, ज्येष्ठ नेते बळीराम राठोड, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील, पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब पाटील, सरपंच पांडुरंग मोरे, माजी सरपंच सोमनाथ पाटील, सरपंच योगेश पाटील, सरपंच विजय पाटील, महेश पाटील, उमाकांत पाटील यांच्यासह शेतकरी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.