Another provision of 741 crores for the memorials of Dr. Babasaheb Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आणखी ७४१ कोटींची तरतूद
#Budget 2023
# महिलांना बस प्रवासात ५० टक्के सवलत
# ओबीसींसाठी मोदी आवास घरकुल योजना
# अंगणवाडी सेविकांना मानधनात वाढ
#Mumbai मुंबई: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात महाराष्ट्राचे वैभव असलेल्या महापुरुषांच्या स्मारकांसाठी भरीव निधीची तरतूद केली. आपल्या भाषणात फडणसवीस यांनी म्हटले की मुंबईच्या इंदू मिल येथे बांधल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी ३४९ कोटी रुपये याआधी देण्यात आले होते, तर आणखी ७४१ कोटी रुपये दिले जातील.
तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी, पुणेच्या भिडेवाडा येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी ५० कोटी रुपये, सांगलीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी २५ कोटी रुपये, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ३५१ कोटी रुपये, स्व. रा. सू. गवई स्मारकासाठी २५ कोटी रुपये, विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारकासाठी निधीची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय सांगलीच्या कोथरूड येथे बांधण्यात येणाऱ्या स्वराज्यरक्षक शिवाजीराव देशमुख स्मारकासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्याचे फडणवीसांनी यादरम्यान जाहीर केलं.
धार्मिक क्षेत्रांनाही निधीची तरतूद
महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. राज्यातील धार्मिक क्षेत्रांच्या विकासासाठी खालीलप्रमाणे निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास : ५०० कोटी रुपये
भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी : ३०० कोटी रुपये
श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण : ५० कोटी रुपये
श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी : २५ कोटी रुपये
श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी
प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी
गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी : २५ कोटी रुपये
श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर: ६ कोटी रुपये
श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) : २५ कोटी रुपये
मागासवर्गीयांसाठी काय?
राज्यातील मागासवर्गीयांसाठी देखील अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत. मागासवर्गीयांसाठी नवीन घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत तीन वर्षात १० लाख घरे बांधली जातील, ज्यासाठी १२ हजार कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. या घोषणेतील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत…
प्रधानमंत्री आवास योजना: ४ लाख घरे
(२.५ लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग)
रमाई आवास : १.५ लाख घरे/१८०० कोटी रुपये
(किमान २५ हजार घरे मातंग समाजासाठी)
शबरी, पारधी, आदिम आवास : १ लाख घरे/१२०० कोटी रुपये
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: ५०,००० घरे/६०० कोटी
(२५,००० घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : २५,००० घरे)
इतर मागासवर्गियांसाठी नवीन घरकुल योजना : मोदी आवास घरकुल योजना : तीन वर्षांत १० लाख घरे /१२,००० कोटी रुपये (या योजनेत यावर्षी ३ लाख घरे बांधणार/३६०० कोटी रुपये)