अमृतमहोत्सवानिमित्त ११ शेतकऱ्यांना गोदान
धुळे : ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवातही अग्रवाल कुटुंबाने दुष्काळी स्थितीचे समाजभान राखत शेतकऱ्यांप्रती आपली संवेदनशीलता दाखवून दिली. ११ शेतकऱ्यांना वासरांसह दुभत्या गायींचे दान करतानाच त्यांनी शासनाच्या दुष्काळ निधीसाठी ११ लाखांचा धनादेश देण्याचे जाहीर केले. ओपीजी हे शहराच्या सामाजिक, राजकीय, सहकार, आध्यात्मिक, उद्योग क्षेत्रातले भीष्म पितामह आहेत. त्यांचा जीवनप्रवास संघर्षशील राहिला. राष्ट्रवादाची प्रेरणा घेत त्यांची जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सुरू झालेली वाटचाल भारतीय जनता युवा मोर्चा आणि भाजपमधील विविध जबाबदाऱ्यांनी युक्त आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. ४) येथील खान्देश गोशाळेच्या मैदानावर ओपी शेट यांचा सन्मान, भजनसंध्या, भक्तिमय गीतगायन, शेतकऱ्यांना गोदानाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री. बावनकुळे बोलत होते. यावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, सत्कारमूर्ती अग्रवाल, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार स्मिता वाघ, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार सर्वश्री अमरिशभाई पटेल, मंगेश चव्हाण, नंदकिशोर महाजन, काशिराम पावरा, माधवी नाईक, रोहिणी नायडू, मंजुळा गावित, राहुल ढिकले, राम भदाणे, अमोल जावळे, राजेश पाडवी, लक्ष्मण सावजी, महापौर मायादेवी परदेशी, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी प्रमुख पाहुणे होते.
सरकार अनुपभैयांच्या पाठीशी : बावनकुळे : श्री. बावनकुळे म्हणाले, की सर्वप्रथम धुळे शहरवासीयांपुढे नतमस्तक होतो, की तुम्ही सर्वांनी अनुपभैया अग्रवाल यांच्या रूपाने हिरा कार्यकर्त्याला विधानसभेत पाठविले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये उत्कृष्ट काम करणारे आमचे जे १० आमदार आहेत त्यातील एक अनुपभैया आहेत. धुळे शहराचे जेही प्रश्न, समस्या आहेत ते सोडविण्यासाठी ते सतत पाठपुरावा करत असतात. आम्हीही त्यांना सहकार्य करत आहोत. आजही ओपीजींनी विधानसभा निवडणुकीत अनुपभैयांनी शहरवासीयांना जी-जी वचने दिली ती पूर्ण करण्यासाठी सरकारने त्यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. मी धुळेकरांसमोर जाहीर करतो, की अनुपभैयांनी शहर विकासासाठी मागितलेले प्रत्येक काम राज्य सरकार पूर्ण करेल.
ओपीजींची संघर्षातून वाटचाल : मंत्री रावल : पालकमंत्री रावल म्हणाले, की आई-वडिलांमध्येच देव असतो या भावनेतून आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी आपल्या वडिलांचा अमृतमहोत्सवाचा अप्रतिम सोहळा घडवून आणला. ओपी शेट यांनी अत्यंत कष्टातून, संघर्षातून जीवनाची वाटचाल केली. जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि नंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी निभावली. विविध आंदोलनांतून भाजपची पाळेमुळे या जिल्ह्यात रोवली. त्यांच्याच संस्कारांतून घडलेल्या अनुपभैयांनी दुष्काळी स्थितीचे समाजभान राखत आज वडिलांप्रती ऋण व्यक्त करताना त्यांच्या अमृतमहोत्सवासाठी जमविलेला गोतावळा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. ओपी शेट यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा.

ओपीजी हे द्रष्टे व्यक्तिमत्त्व : महाजन : जलसंपदामंत्री महाजन म्हणाले, की ओपी शेट यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस हा त्यांच्या ७५ वर्षांच्या संघर्षाचा, संस्कारांचा आणि समाजसेवेचा दीर्घ प्रवास आहे. जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए याची प्रचिती ओपी शेट यांच्या जीवनप्रवासातून येते. तुम्ही किती वर्षे जगला यापेक्षा कसे जगलात याला जास्त महत्त्व असते. तुम्ही समाजासाठी, गोरगरीब गरजूंसाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी काय योगदान दिले हे महत्त्वाचे ठरते. ओपी शेट यांचा जीवनपट संघर्षशील असून, त्यांनी नेहमीच सामाजिकतेचे भान राखत जीवनप्रवास केला. त्यांचा जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपमधील योगदान पाहता ते आजही आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत. राजकारण, समाजकारण, उद्योग, शिक्षण, सहकार, अर्थकारण आदी क्षेत्रांत वावरताना त्यांनी गोरगरीब, सामान्य जनतेसाठी कार्य केले. माणसे जोडली. अनुपभैयांच्या रूपाने त्यांच्या कुटुंबातून एक चांगला लोकप्रतिनिधी शहराला लाभला. ओपीजींनी त्यांना चांगले संस्कार दिले. ३०० सदस्यांचा हा परिवार आजही एकसंध आहे, याचे सारे श्रेय ओपीजींना आहे. अशा व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
रावेर एमआयडीसीची जागा मंजूर : अनुपभैया : आमदार अग्रवाल म्हणाले, की आज ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत महसूलमंत्री बावनकुळे यांनी आज मोठी भेट दिली आहे. आपल्या सर्वांचे ४० वर्षांपासूनचे एमआयडीसी विस्तारीकरणाचे जे स्वप्न होते ते आज पूर्ण झाले आहे. त्यांनी आज रावेर एमआयडीसीसाठी २००० एकर जागा मंजूर केली आहे. यामुळे शहराच्या औद्योगीकरणाला मोठी चालना मिळणार असून, या एमआयडीसीत स्थानिक कुशल-अकुशल मनुष्यबळाला रोजगाराच्या मोठ्या संधी प्राप्त होणार आहेत. या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे शतशः आभार मानतो.

आमदार अनुपभैया आम्हा सर्वांचे लाडके आमदारमहसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, की अनुपभैया आम्हा सर्वांचे लाडके आमदार आहेत. त्यांनी शहराच्या विकासासाठी सांगितलेल्या प्रत्येक कामासाठी निधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज आपल्या अमृतमहोत्सवानिमित्त शुभेच्छा पाठविल्या आहेत. त्यांनी सांगितले, की आमदार अनुपभैयाच्या नेतृत्वात धुळे शहर प्रचंड शक्तिशाली बनवू. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज धुळे शहराच्या विकासासाठी ४० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. यासाठी आमदार अनुपभैया आणि महापौर मायादेवी परदेशी यांच्याकडून सतत पाठपुरावा सुरू होता. तो आज यशस्वी ठरला आहे.













