चित्रफीत, वक्त्यांनी भाषणांतून उलगडला संघर्षशील जीवनपट
धुळे : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सोमवारी (ता. ५) अभीष्टचिंतनासह सन्मानपत्र प्रदानाचा मुख्य कार्यक्रम झाला. येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील टॉपलाइन रिसॉर्टमध्ये सायंकाळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह धुळेकरांच्या साक्षीने झालेल्या रंगतदार सोहळ्यात ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल समितीने सन्मानपत्र देत त्यांच्या विविध क्षेत्रांतील निरपेक्ष कार्याचा कृतार्थ गौरव केला. तसेच श्री. अग्रवाल यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेल्या चित्रफितीतून तसेच विविध वक्त्यांनी त्यांच्या भाषणांतून श्री. अग्रवाल यांचा संघर्षशील जीवनपट उलगडून दाखविला.

श्री. अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त काल (ता. ६) सायंकाळी टॉपलाइन रिसॉर्टमध्ये श्री. अग्रवाल यांना अमृतमहोत्सव समितीतर्फे सन्मानपत्र प्रदानासह त्यांच्या सत्काराचा सोहळा झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय कार्यवाह बाळासाहेब चौधरी, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार सर्वश्री अमरिशभाई पटेल, काशिराम पावरा, मंजुळा गावित, राजूमामा भोळे, अमोल जावळे, माजी आमदार कुणाल पाटील, भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, धुळ्याच्या महापौर मायादेवी परदेशी, ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक, ज्येष्ठ उद्योजक विनोद मित्तल, डॉ. महेश घुगरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे होते. यावेळी पालकमंत्री रावल, मंत्री सावकारे यांच्यासह अमृतमहोत्सव समिती सदस्यांच्या हस्ते ओमप्रकाश अग्रवाल यांना सन्मानपत्र, शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
आमदार अनुपभैयांची विविध संस्थांना देणगी : आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी प्रास्ताविकात सांगितले, की माझ्या वडिलांचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचे भाग्य मला व अमृतमहोत्सव समितीला लाभले. धुळेकरांनी आमच्या परिवाराला गेल्या ७५ वर्षांपासून जी प्रेमाची सावली दिली त्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. तुमचा जनसेवक आमदार म्हणून मला सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दलही आज सर्वांचे आभार मानतो. मला आमदार म्हणून जे वेतन मिळते त्या वेतनातून ११ लाख रुपयांचा धनादेश शासनाला दुष्काळी निधीसाठी देण्याचे जाहीर करतो. डॉ. दुग्गल स्मृती समितीच्या मातोश्री वृद्धाश्रमासाठी दर वर्षी दोन लाखांचा धनादेश देण्यासह आदिवासींसह जनसामान्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या देवगिरी कल्याण आश्रमालाही एक लाख रुपयांची देणगी देण्याची घोषणाही आमदार अग्रवाल यांनी केली.
सर्वसामान्यांचे हित जोपासणारा नेता : पालकमंत्री रावल म्हणाले, की एका सामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती स्वतःच्या जिद्दीने, कष्टाने, संघर्षाने व निरपेक्ष भावनेतून जेव्हा काम करतो तेव्हा त्याला यश नक्कीच मिळते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ओमप्रकाश अग्रवाल. त्यांनी जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भारतीय जनता पक्षाच्या उभारणीसह विविध क्षेत्रांत काम करताना सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या उत्कर्षासाठी झटले म्हणूनच आज त्यांचे पुत्र अनुपभैया आज शहराचे आमदार म्हणून आपल्यासोबत आहेत. ओपी शेट यांनी लावलेल्या रोपट्याचा आज मोठा वटवृक्ष झाला असून, त्याची सावली आणि फळे आज आपण चाखत आहोत. ओपी शेट यांना अमृतमहोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

ओपीजींचे जीवन आदर्शवत : वस्त्रोद्योगमंत्री सावकारे म्हणाले, की आपण जीवनात किती पैसा कमावला यापेक्षा आपली मुले कशी घडली, याला जास्त महत्त्व असते. आज आपला अमृतमहोत्सव साजरा करत असताना इतका नितांत सुंदर सोहळा घडवून आणणाऱ्या अनुपभैयांविषयी ओपी शेट यांना आज नक्कीच समाधान वाटत असेल. त्यांनी दिलेल्या संस्कारांचा हा भाग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या ओपी शेट यांनी स्वतः लहानपणापासून संघर्षाची जी वाट धरली आणि आयुष्याच्या या प्रवासात सर्वसामान्यांच्या कल्याणाची जी कास धरली त्यामुळेच आज त्यांचा पुत्र अनुपभैया आमदार म्हणून धुळेकरांचे नेतृत्व करत आहेत. आज त्यांचा चित्रफितीतून जीवनपट पाहिल्यानंतर त्यांचे जीवन आजच्या तरुण पिढीला आदर्शवत आणि अनुकरणीय असाच आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा.
ओपीजींनी संघर्षातून साधला उत्कर्ष : आमदार अमरिशभाई पटेल म्हणाले, की ओपी शेट यांच्या पत्नी तथा अनुपभैयांच्या मातोश्री (कै.) विमलादेवी यांचे माहेर शिरपूरचेच. आम्ही जेव्हा शिरपूरला आलो तेव्हा सुरवातीला त्यांच्या वडिलांच्या घरातच आम्ही भाड्याने राहत होतो. तेव्हापासून या कुटुंबाशी आमचा पारिवारिक संबंध आहे. ओपी शेट यांनी जीवनाच्या सुरवातीच्या काळात केलेला संघर्ष आणि त्यातून उत्कर्ष साधताना दिलेल्या चांगल्या संस्कारांमुळेच आमदार अनुपभैया घडले. आता आपल्यावर सर्वसामान्यांच्या कल्याणाची, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याला न्याय देण्याची जबाबदारी अनुपभैयांवर आहे. त्यासाठी ओपी शेट यांनी दिलेले विचार आणि संस्कारांची कास धरत कार्यरत राहावे, अशी अपेक्षा आमदार पटेल यांनी व्यक्त केली.
ओपीजींचे जीवन प्रत्येकासाठी अनुकरणीयप्रा. प्रकाश पाठक म्हणाले, की ओमप्रकाशजींचे वडील पुरणमलजी राजस्थानातून धुळ्यात आल्यानंतर जनसंघ आणि संघाचे काम निष्ठेने करत होते. वडिलांच्या संस्कारांमुळेच ओपी शेट संघाशी एकरूप झाले. दुर्लक्ष, टिंगल, टीका, समजून घेण्याची भूमिका या चार टप्प्यांनंतर गौरव किंवा कौतुकाचा टप्पा म्हणजे अमृतमहोत्सवाचा टप्पा असतो. ओपी शेट यांचा जीवनप्रवासही या पाच टप्प्यांतून घडला आहे. ज्यांना भविष्य घडवायचे आहे, ज्यांना वर्तमानातून विकास साधायचा आहे त्यांनी भूतकाळाकडे बारकाईने बघितले पाहिजे, याची जाणीव त्यांनी सतत ठेवली. हा प्रवास करताना कष्टाची त्यांनी यथार्थ जाणीव ठेवली. या जीवनप्रवासात ओपी शेट यांनी सातत्याने माणसे जोडण्याचे काम केले. संघ, भाजपमध्ये काम करताना ते कायम कार्यकर्त्याच्या भूमिकेत वावरले. त्यांनी अनेक पदे भूषविली मात्र ते आयुष्यभर निरपेक्षपणे जगले, वावरले. आनंदात हुरळायचे नाही, दुःखात नाउमेद व्हायचे नाही, कष्टात चिंता करायची नाही, संघर्षात थांबायचे नाही आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यश मिळाल्यानंतर ते माझे नाही, तर सर्वांचे मिळून आहे, असे मानणारे, सर्वांना बरोबर घेऊन चालणारे आणि मानवी साखळी निर्माण करणाऱ्या ओमप्रकाशजींचे जीवन प्रत्येकाला अनुकरणीय आहे. पुढच्या पिढीवरही हाच संस्कार घडावा, अशी अपेक्षा प्रा. पाठक यांनी व्यक्त केली.













