गुटख्याच्या तस्करीसाठी मध्यप्रदेश, गुजरातसह महाराष्ट्रात रॅकेट सक्रिय
Dhule News धुळे : गुटखा खाण्याने कॅन्सर होतो. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने गुटखाबंदी कायदा केला. पण गुटखा शौकीनांना स्वतःच्या आरोग्याची काळजी नसल्याने महाराष्ट्रात आणि विशेष करून धुळे जिल्ह्यात गुटख्याला वाढती मागणी आहे.
तथापि, शेजारच्या गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यात गुटखाबंदी नसल्याने या धंद्यातील लोक त्या राज्यांमधून गुटखा आयात करतात. गुटख्याच्या या जीवघेण्या धंद्यात मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात तस्करांचे रॅकेट सक्रिय आहेत. ट्रकच्या ट्रक भरून हाल धुळ्यात येतो. शिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यात धुळेमार्गे गुटख्याची वाहतूक केली जाते. दर महिना-दोन महिन्यात गुटखा पकडला जातो. मंगळवारी धुळ्याच्या क्राईम ब्रांचने तब्बल २९ लाखांचा गुटखा पकडला.
येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने केलेल्या एका कारवाईत तब्बल २९ लाखांचा गुटखा पकडला. पोलिसांनी आयशर वाहनासह ४४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी इंदूरच्या दोघांना अटक केली आहे. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि पान मसाल्याची इतर राज्यांमधून तस्करी होत आहे. कायद्याने बंदी असलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने आणला जात असल्याने पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी एलसीबी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
क्राइम ब्रॅंचला मिळाली टिप
६ जून रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती मिळाली की, इंदूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकमधून (क्रमांक एम. एच. १८ बीजी ३३०२) गुटख्याची वाहतूक होत आहे. त्यानुसार कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नरडाणा पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल अन्नपूर्णाजवळ बातमीप्रमाणे आयशर ट्रक येताना दिसल्याने त्यास थांबवून पकडण्यात आले.
चौकशीत आढळला गुटखा
पोलिसांनी ट्रक चालकाला त्याचे नाव-गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव सदाशिव रामचंद्र राठोड (३५, रा. महू जी. इंदूर ,मध्यप्रदेश) असे सांगितले आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीचे नाव सिकंदर कैलास सोनगरा (४५, रा. हरसोला, ता. महू जी. इंदूर) असे सांगितले. त्यांना ट्रकमधील मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे ट्रकमधील मालाची खात्री केली असता त्यात गुटख्याचा साठा आढळून आला.
असा आहे गुटख्याचा साठा
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पान मसाला मिळून आला. त्यात ४ लाख ३२ रूपये किमतीचा आरएमडी पान मसाला, २ लाख ८८ हजार रूपये किमतीचा एम सेन्टेड तंबाखू गोल्ड, ६ लाख १५ हजार ६०० रूपये किमतीचा रजनीगंधा पान मसाला, १ लाख ५५ हजार ५२० रूपये किमतीचा तुलसी रॉयल लाल पाणी जर्दा, २ लाख ६१ हजार २६० रूपये किमतीचा विमल पान मसाला, २९ हजार ४०० रूपये किमतीची तंबाखू, १३ हजार ५०० रूपये किमतीची डबल ब्लॅक १८ प्रीमियम तंबाखू, १ लाख ४४ हजार रुपये किमतीचा राजश्री पान मसाला, ३८ हजार ८८० रूपये किमतीची चैनी खैनी प्रीमियम फिल्टर पाऊच, ८ लाख ८८ हजार ८५८ रूपये किमतीचा परचूटन माल, १५ लाख रुपयांचा आयशर ट्रक असा एकूण ४३ लाख ६७ हजार ९२८ किमतीचा माल जप्त करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक योगेश राऊत, हेड कॉन्स्टेबल प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, योगेश चव्हाण, प्रकाश सोनार, पोलीस नाईक कमलेश सूर्यवंशी, प्रशांत चौधरी, कॉन्स्टेबल राहुल गिरी, मयूर पाटील, तुषार पारधी, योगेश साळवे यांनी केली.
काय म्हणाले पोलीस अधीक्षक?
गुटक्याची मोठी तस्करी पोलिसांनी रोखली आहे. गुटखा तस्कर जिल्ह्यात किती सक्रिय आहेत, हे यावरून दिसून येते. पोलीस विभागाने दक्षतेने कारवाई केल्याने गुटखा तस्करांचे कंबरडे मोडले आहे. गुटखाविरोधी कारवाई आणखी तीव्र केली जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.