नोकर भरतीच्या भरमसाठ फी ला सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा विरोध
Dhule News धुळे : राज्यात सध्या तलाठी आणि वनरक्षक यासह विविध पदांसाठी नोकर भरती सुरू आहे. परंतु ऑनलाईन अर्ज भरताना शासनाने आकारलेले अव्वाच्या सव्वा शुल्क शेतकरी आणि सामान्य कुटुंबातील गरीब मुलांना व पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे परीक्षा शुल्क त्वरित कमी करावे, निशुल्क परीक्षा घ्याव्यात अशी मागणी करीत सत्यशोधक संघटनेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यार्थी गरीब कुटुंबातून येत असतात. त्यांचा शैक्षणिक संघर्ष प्राथमिक शिक्षणापासून सुरू होतो. काहींचा माध्यमिक शिक्षणापर्यंत संपलेला असतो आणि जे विद्यार्थी/विद्यार्थिनी उच्च माध्यमिक आणि उच्चस्तरीय शिक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवतात, तग धरून असतात, त्यांच्यासमोर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी/रोजगाराचा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून विद्यार्थी स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळतात तर काही विद्यार्थी पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी, स्टाफ सिलेक्शन, शिपाई आणि नाहीच जमलं तर मिळेल ते काम करून आपलं पुढचं भविष्य स्थिर करण्याचा प्रयत्न करतात. सध्या होऊ घातलेल्या सरळ सेवा आणि तलाठी, वनरक्षक DMER सारख्या खात्याची भरती प्रक्रिया सरकार खाजगी संस्थांकडे राबविण्यासाठी देत असते. याचा अर्थ असा घ्यायचा का की, सरकारी यंत्रणा स्वत: संपूर्ण भरती प्रक्रिया राबविण्यास असक्षम आहे. कारण खाजगी संस्थांना भरती प्रक्रिया राबविण्यास दिल्या कारणाने खाजगी संस्थांकडून विद्यार्थ्यांची सर्रास लुटमार होताना दिसते. २०१८ आणि त्यापूर्वी झालेल्या तलाठी किंवा वन विभागाच्या परीक्षेसाठी आकारण्यात आलेले शुल्क हे मागासवर्गीय ( SC, ST, NT, VJNT, महिला, अल्पसंख्यांक, अपंग) यांना ३०० ते ३५० आणि खुल्या प्रवर्गासाठी ५०० ते ५५० असे होते.
आता मात्र नुकतीच झालेली DMER ची परीक्षा त्यासाठी मागासवर्गीय ( SC, ST, NT, VJNT, महिला, अल्पसंख्यांक, अपंग ) यांना सरसकट ९०० आणि खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. एका अर्जासाठी ९०० आणि एकाच वेळेस तीन अर्ज केले तर प्रति विद्यार्थी/ विद्यार्थिनी श ३६०० असा खर्च करावा लागतो. महाराष्ट्र राज्य हे शेतीप्रधान राज्य आहे. शेतकरी, कष्टकरी, गरीब मजुरांची मुलं या नोकर भरतीची तयारी करत असतात आणि वर्षानुवर्षे वाट बघत असतात. अश्यात इतक्या मोठ्या प्रमाणात शुल्क त्यांच्याकडून आकारून शासन त्यांची नोकरीची संधी हिरावून घेण्याचं काम करत आहे. आधीच शेती प्रश्न अतीशय गंभीर झालेला आहे. शेतीक्षेत्र संकटात सापडलेले आहे.
शेतकरी, कष्टकरी वर्ग कर्जाच्या पैशाने मुलांचे शिक्षण पूर्ण करीत आहे. असे असताना एवढे मोठे शुल्क भरण्यासाठी मुलांना पैसे आणायचे कुठून? शासन आपआपल्या पातळीवर नोकर भरती मोफत घेऊ शकते आणि ते महाराष्ट्रासारख्या राज्याला सहज शक्य आहे. म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन खूप कमी दरात नाममात्र शुल्कात तसेच महिला आणि मागासवर्गीय घटकांना नि:शुल्क आवेदन करून भरती प्रक्रिया राबवते. तशीच महाराष्ट्र सरकारने इतर सगळ्या भरत्या राबवाव्यात ही सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची प्रमुख मागणी आहे.
मागण्या खालीलप्रमाणे
सध्या सुरू असलेली तलाठी आणि वन विभागाची भरती आवेदन प्रक्रिया थांबवून त्या भरतीचे शुल्क, नी: शुल्क अथवा नाममात्र दरात आकारून पुन्हा नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी, सर्व प्रकारच्या नोकर भरती प्रक्रिया या खाजगी संस्थांना न देता स्वतः सरकारी यंत्रणेने राबवाव्यात किंवा खाजगी यंत्रणेवर शुल्क आकारण्याबाबत मर्यादा घालून द्याव्यात, आगामी सर्व प्रकारच्या शासकीय नोकर भरती नी:शुल्क कराव्यात तसेच त्याबाबत समान धोरण असावे, विद्यार्थ्यांकडून आवेदन करून व परीक्षा शुल्क भरूनही आजपर्यंत ज्या भरती झालेल्या नाहीत त्यांची लवकरात लवकर प्रक्रिया सुरू करावी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क परत करावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने लवकरात लवकर या मागण्या मान्य करून त्यावर अंमलबजावणी करावी. अन्यथा सत्यशोधक विद्यार्थी संघटना आर्थिक शोषणाच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देत आहे. यावेळी सिद्धांत बागुल, हर्ष मोरे, मानसी पवार, विशाखा अहिरे, नीलिमा भामरे , साक्षी आहिरे, मनीष दामोदर, हर्ष वाघ , शत्रुघन शिंदे, राकेश अहिरे, जितू अहिरे, संदीप बोरसे, अमोल शिरसाठ आदी उपस्थित होते.
२०१८- १९ तलाठी परीक्षा शुल्क मागासवर्गीय – ३५०, खुला प्रवर्ग – ५००
२०२३ – तलाठी मागासवर्गीय ९०० , खुला प्रवर्ग १०००
२०१८-१९ वनरक्षक परीक्षा शुल्क मागासवर्गीय ३५०, खुला प्रवर्ग ५००,
२०२३ वनरक्षक, मागासवर्गीय-९०० , खुला प्रवर्ग-१०००,
२०२३ -DMER , मागासवर्गीय -९००, खुला – १००० अशा प्रकारची परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे.













