पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांचे अतिशय दिमाखदार काम सुरू असून त्यात ते तरबेज आहेत, असा चिमटा त्यांनी काढला. “शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे धुळ्यात अतिशय सुंदर नियोजन झाले आहे. परंतु आता हे दोन पक्षाचे सरकार नसून आम्हीही आता सामील झालो आहोत. त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही झेंडे लावले पाहिजे होते, असा टोला अजित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावला.”
Dhule News धुळे : शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने शहरात विविध रस्त्यांवर आणि चौकांमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे झेंडे लावले होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे लावले नव्हते. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. अजित पवारांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, कार्यक्रमाच्या नियोजनाच्या घाईगर्दीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे लावणे चुकून राहून गेले असेल. परंतु यापुढे काळजी घेतली जाईल असे स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांचे विमान धुळ्याऐवजी जळगावला का लँड झाले? : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी धुळ्याला येण्यासाठी निघालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान खराब हवामानामुळे धुळे विमानतळ ऐवजी जळगाव विमानतळावर लँड झाले. कारण धुळ्याच्या नभांगणात ढग दाटून आले होते आणि पाऊसही सतत सुरू होता. त्यामुळे गोंदूर विमानतळाचा रनवे पायलटला दिसत नव्हता. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जळगाव विमानतळावर विमान लँड करण्याचा निर्णय ऐनवेळी घ्यावा लागला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जळगाव येथून रस्ते मार्गाने धुळ्याला पोहोचले. त्यामुळे त्यांना यायला फार उशीर झाला.
लाभार्थी, नागरिक अन् कार्यकर्त्यांचेही हाल : शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरत बायपास हायवेलगत असलेल्या एसआरपीएफच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची वेळ 11 वाजेची असल्याने खेड्यापाड्यातील लाभार्थी, नागरिक आणि कार्यकर्ते सकाळ पासूनच निघाले होते आणि अकरा वाजेच्या आधी कार्यक्रम स्थळी पोहोचले होते. परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विलंबामुळे हा कार्यक्रम तब्बल पाच वाजेपर्यंत लांबला. अशातच सतत पाऊस सुरू असल्याने सर्वांचे हाल झाले. स्टेजसह मंडपामध्येही पाणी साचले होते. काही कार्यकर्ते आणि लाभार्थ्यांना खुर्च्या डोक्यावर घेऊन पावसापासून बचाव करावा लागला. कार्यक्रम स्थळापासून चौफेर एक किलोमीटरपर्यंत कुठेही हॉटेल्स किंवा उपहारगृहे नसल्याने लाभार्थ्यांचा आणि नागरिकांचा दिवस अन्न पाण्यावाचून गेला. साक्री रोडवर कुमारनगर परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये काही लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. अनेक लाभार्थी, नागरिक आणि कार्यकर्ते दुपारीच परतीच्या प्रवासाला लागले होते. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना स्टेजवर बोलावले जाणार होते ते लाभार्थी आणि भाजपाचे धुळे शहर आणि लगतचे कार्यकर्तेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
धुळे-इंदूर रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करणार : जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनविणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेच्या कामासह धुळे शहराच्या विकास कामांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. धुळे-इंदूर रेल्वे मार्गाचे भूसंपादनाचे काम जलदगतीने सुरू असून हा रेल्वे मार्गही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
येथील एसआरपीएफ मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ अभियानातंर्गत धुळे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवककल्याण, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, मंत्री अनिल पाटील, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, आमदार किशोर दराडे, जयकुमार रावल, मंजूळाताई गावीत, काशीराम पावरा, चिमणराव पाटील, मंगेश चव्हाण, महापौर प्रतिभा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार : सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नये यासाठी शासनच जनतेपर्यंत जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देशाचा झपाट्याने विकास होत आहे. तापी मधील बॅरेजच्या पाण्याचा वापर वाढला पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आर्थिक शिस्त ठेवत शासन सर्वसामान्यांसाठी सर्वांगिण काम करत आहे. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी खर्च करण्याचे शासनाचे धोरण आहे. पाऊस नसल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे असे नमूद करून धरण पाणीसाठ्याचे योग्य नियोजन प्रशासनाने करावे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. धुळे जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. धुळे जिल्ह्यात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गाव-वाड्या-वस्त्यांपर्यंत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर शासनाचा भर राहणार आहे. धुळे जिल्ह्यातील उद्योगांच्या विकासावरही शासनाचा भर राहील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री गिरीष महाजन : धुळे जिल्ह्यात काही भाग आदिवासी बहूल आहे. त्यामुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना आता कुठे जाण्याची गरज नाही. तुमच्या कामासाठी शासनच आता तूमच्या दारी आले आहे. प्रत्येकाला घर, प्रत्येक घरी शौचालय, वीज, पिण्याचे पाणी, गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते, प्रत्येकाला अन्नसुरक्षा मिळाली पाहिजे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेत 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत करण्यात आले आहेत. एक रूपयात पीक विमा योजना, महिलांना एसटी तिकिटात 50 टक्के सवलत, 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास अशा सर्वसामान्यांच्या कल्याणकारी योजना शासन राबवत आहे. राज्य व देशात पायाभूत सुविधांचे जाळे तयार होत आहे. अक्कलपाडा धरण व सुलवाडे बॅरेज प्रकल्पामुळे धुळे जिल्ह्यातील लाखो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. केंद्रीय योजनेत या प्रकल्पांचा समावेश केल्याने कामांना गती येणार आहे. धुळे महानगरपालिकेला सुध्दा विकासकामांसाठी मुबलक निधी देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ लोक कलावंत नथ्थू ईशी, जितेंद्र भोईटे, संतोष ताडे, अरविंद भामरे, मांगू मगरे यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वृध्द कलावंत पेन्शन योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रोजगार मेळाव्यातून रोजगार मिळालेले दिनेश पाटील, चेतन गवळी, अमोल जाधव या तरूणांना यावेळी नियुक्तीयांचे पत्राचे वाटप करण्यात आले.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शासन आपल्या दारी अभियानात केलेल्या कामांची माहिती विशद केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार, आदिवासी विभागाच्या लाभार्थ्यांना कामगार किट, ट्रॅक्टरचे वाटप केले तसेच निवडक सरपंचाशी संवादही साधला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, धुळे जिल्ह्यातील आदिवासी समुदायातील विविध कलाकारांच्या कलापथकांनी स्थानिक आदिवासी नृत्य सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.
एका छताखाली शासकीय विभागांच्या माहितीचे स्टॉल : ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे 34 स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवरांनी आदिवासी विकास विभागाच्या स्टॉलला भेट देऊन लाभार्थ्यांना लाभाचे वितरण केले. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत मिळाल्यामुळे या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या लेखी समस्या, तक्रारी, निवेदने स्वीकारण्यात आली. जिल्हा सामान्य प्रशासन रूग्णालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासही या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोजगार मेळाव्यात एकूण 1800 युवकांनी नोंदणी केली. यापैकी 1250 युवकांची प्राथमिक निवड करण्यात आली तर 215 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या मेळाव्यात 15 विविध आस्थापना सहभागी झाल्या होत्या.
यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार डॉ. हीना गावित, आमदार मंगेश चव्हाण, आमदार जयकुमार रावल यांनी मनोगत व्यक्त केले. राज्यगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर यांनी केले.