काय आहे ‘चांद्रयान 3’ मोहिम? वाचा संपूर्ण माहिती…
श्रीहरिकोटा/धुळे : चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या दिशेने अतीशय महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या मोहिमेचा महत्वपूर्ण भाग असलेल्या चांद्रयान ३ या यानाने शुक्रवारी अंतराळात यशस्वी झेप घेतली आणि भारताच्या अवकाश संशोधनात मानाचा तुरा रोवला गेला. दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून हे प्रक्षेपण झालं. याआधी 2019 मध्ये चंद्रयान-2 मोहिमेदरम्यान लँडरच्या सॉफ्ट लँडिंगमध्ये यश आलं नव्हतं. त्यामुळेच चंद्रयान-3 मोहीम भारतासाठी महत्त्वाची मानली जात असून या मोहिमेकडून अनेक अपेक्षा आहेत.
615 कोटी रुपये खर्च : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने 615 कोटी रुपये खर्चून तयार केलेले हे यान सुमारे 50 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार आहे. ‘चांद्रयान-3’ पाठवण्यासाठी एलव्हीएम-3 लाँचरचा वापर करण्यात आला आहे. जर लँडर सॉफ्ट दक्षिण ध्रुवावर उतरला तर भारत हा दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश बनेल. चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणानंतर 2 वाजून 46 मिनिटे 39 सेकंदाने बूस्टर आणि पेलोड रॉकेटपासून वेगळे करण्यात आले. तर 2 वाजून 48 मिनिटे 30 सेकंदाने चांद्रयान-3 चे प्रक्षेपण तिसऱ्या टप्प्यात पोहोचले. त्यानंतर क्रायोजेनिक इंजिन सुरू होऊन ते चांद्रयानासोबत पुढे जात आहे. 2 वाजून 57 मिनिट 48 सेकंदाने चांद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत स्थापित झालं आहे. मिशन डायरेक्टर एस. मोहनकुमार यांनी ही माहिती दिल्याबरोबर सतीश धवन सेंटरमध्ये जल्लोष सुरू झाला. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यावेळी म्हणाले की, एलव्हीएम-3 एम 4 रॉकेटने चांद्रयान-3 योग्य कक्षेत ठेवलं आहे. चांद्रयान 3 ने चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ हर्षल विभांडीक यांनी या मोहिमेविषयी तसेच तंत्रज्ञानाविषयी नंबर वन महाराष्ट्रला अधिक माहिती दिली. ती खालीलप्रमाणे:
काय आहे चंद्रयान-3 चा उद्देश ? : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आपल्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान मोहिमेअंतर्गत 14 जुलैला चंद्रयान-3 चं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. 5 ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. तसंच त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरायला सुरूवात करेल. त्यामुळे 23 ऑगस्ट हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या मोहिमेत चंद्रयानचा एक रोव्हर (छोटा रोबोट) बाहेर येईल जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्याचं स्थान निश्चित केलं जाईल. इथंच रोव्हर चंद्राच्या या भागात कोणते खनिजं आहेत, पाणी आहे का, इत्यादीचा शोध घेईल. भविष्यात कधी चंद्रावर वसाहती स्थापन करायच्या असतील, तर यामुळे खूप मदत होईल. ही या शोधाची खास गोष्ट असेल.
चांद्रयान २ आणि चांद्रयान ३ मोहिमेची तुलना : चंद्रयान-3 मोहिमेची किंमत चंद्रयान-2 पेक्षा 30% कमी आहे. चंद्रयान-2 पाठवलं तेव्हा त्याचे तीन भाग होते. ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर. ऑर्बिटर यशस्वी झालं आणि ते अजूनही चंद्राच्या कक्षेत फिरत आहे. ऑर्बिटर आधीपासूनच तिथं असल्यामुळे ऑर्बिटरचा वेगळा प्रयोग नाही. अशा परिस्थितीत ऑर्बिटरचा संपूर्ण खर्च यावेळी वाचला आहे. इस्रोची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे बहुतेक कामं इन-हाऊस केले जातात. म्हणजेच इस्रो स्वतःहून बरेच तंत्रज्ञान विकसित करतं. यामुळे आपण कमी खर्चात एक मोठी मोहीम राबवत आहोत.
गेल्या 50 वर्षांत अनेक मोहिमा आखल्या गेल्या आणि अंमलात आणल्या गेल्या. पण चंद्रयान-1 ने पहिल्यांदाच चंद्रावर पाण्याचा शोध लावला. त्यावेळी जरी त्याचे लँडर बाहेर येऊ शकले नाही, तरी यावेळी खात्री आहे की ते बाहेर येईल. या विश्वासामागील कारण म्हणजे लँडरसाठी जे तंत्रज्ञान वापरले गेलं होतं, त्यात आता खूप बदल केले आहेत. शास्त्रज्ञांनी चंद्राचा एक आव्हानात्मक भाग निवडला आहे. या भागाला लुनर साउथ पोल म्हणतात. याची खास गोष्ट म्हणजे पृथ्वीवरून त्यावर थेट नजर ठेवणं कठीण काम आहे.