धुळे जिल्ह्यातून दोन मुली सैराट, अपहरणाचे गुन्हे दाखल
Dhule News धुळे : जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या गावातून दोन मुलींना फुस लाऊन पळवून नेल्याप्रकरणी त्यांच्या पालकांनी अपहरणाचे गुन्हे दाखल केले आहेत.
शिंदखेडा तालुक्यातील भडणे गावात राहणारी एक अल्पवयीन मुलगी शिंदखेडा येथे एसएसव्हीपीएस महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. दररोज ती काॅलेज संपवून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत गावातील घरी परत येते. परंतु २७ जुलै रोजी ती घरी परतलीच नाही. मोबाईलवर काॅल केला असता फोन बंद होता. सर्वत्र शोध घेतल्यावरही ती सापडली नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात इसमाने तिला आमिष दाखवून पळवून नेले असावे, अशी खात्री पालकांना पटली. त्यानुसार त्यांनी पोलिसांना फिर्याद दिली. शिंदखेडा पोलिसांनी २८ जुलै रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पीएसआय पवार करीत आहेत.
दरम्यान, परसामळ या. शिंदखेडा गावातून अन्य एक अल्पवयीन मुलीला अज्ञात तरूणाने फुस लाऊन पळवून नेल्याची घटना १८ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी तिच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून २८ जुलै रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे करीत आहेत.
हेही वाचा