‘मेरी माटी, मेरा देश’अभियान
धुळे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभरात ‘मेरी माटी, मेरा देश’अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविण्यात येणार असून या अभियानात जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होवून हे अभियान यशस्वी करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, धुळे जिल्ह्यात 9 ते 20 ऑगस्ट, 2023 दरम्यान ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हा उपक्रम गाव आणि गटस्तरावर, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपंचायत तसेच महापालिका क्षेत्रात आयोजित करण्यात येणार आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक शिलाफलक उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरी भागामध्ये नगरपालिका तसेच महापालिका क्षेत्रात एक असे शिलाफलक (स्मारक फलक) उभारले जातील. या शिलाफलकावर जिल्हयातील देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीर, स्वातंत्र्य सैनिकांची नावे या शिलाफलकावर राहतील. हे शिलाफलक 15 ऑगस्ट पर्यंत उभारुन त्याठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. याठिकाणी 75 वृक्षाची लहान ‘अमृत वाटिका’ तयार करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी सामुहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात येणार आहे. प्रत्येक गावस्तरावर 9 ते 15 ऑगस्ट पर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. 16 ते 20 ऑगस्ट या कालावधीत महापालिका, नगरपालिका, पंचायतस्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
तसेच दिल्लीत ‘अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी प्रत्येक गावाची माती एक मातीच्या कलशात संकलीत करुन एकत्रित माती तालुकास्तरावर पंचायत समिती येथे जमा करण्यात येणार आहे. आणि प्रत्येक पंचायत समितीकडून जिल्हा युवक स्वंयसेविकांकडे जमा करुन दिल्ली येथे अमृत वाटिका तयार करण्यासाठी संकलीत केली जाणार आहे. दिल्लीत ‘अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून 7500 कलशांमध्ये माती घेऊन ‘मिट्टी यात्रा’ काढण्यात येणार असून ही ‘अमृत वाटिका’ ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या वचनबद्धतेचे प्रतीक असणार आहे.
जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी (जन भागीदारी) https://merimaatimeradesh.gov. in/ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, लोक माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करू शकतील. अशी माहिती श्री. गोयल यांनी दिली आहे.
मेरी माटी, मेरा देश, पंचप्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन, मिट्टी यात्रा हे उपक्रम यशस्वी होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वांतत्र्य सैनिक, पत्रकार सामाजिक संस्था यांच्याशी समन्वय साधून हे अभियान उत्तमप्रकारे आयोजित करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले. त्याचप्रमाणे गतवर्षाप्रमाणे यावर्षी देखील ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपले घर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा, सर्व दुकाने, आस्थापनांनी या उपक्रम स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.