प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा
धुळे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा शाखेतर्फे रविवारी भव्य रक्तदान शिबिर झाले. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात जवळपास तीनशे ते चारशे युवक रक्तदान करतील अशी अपेक्षा भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर (Gajendra Amplkar) यांनी व्यक्त केली.
शहरातील कुंभार खुंट येथे झालेल्या या शिबिराचा शुभारंभ माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर प्रतिभा चौधरी, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, सभागृह नेत्या भारती माळी, युवा मोर्चा महिला शहराध्यक्ष वैशाली शिरसाठ, मायादेवी परदेशी, भाजपाचे सरचिटणीस ओम खंडेलवाल, नगरसेवक हिरामण गवळी, दगडू बागुल, राजेश पवार, महादेव परदेशी, विनोद थोरात, पंकज धात्रक, सुहास अंपळकर यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अंपळकर म्हणाले, भारताचे विकास पुरुष ज्यांनी आपल्या विकासाची छाप संपूर्ण जगावर टाकलेली आहे. असे आपल्या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त युवा मोर्चाने रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या माध्यमातून सामाजिक जाणीवही अधिक निर्माण होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. जिल्हा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी व त्यांच्या समूहाने या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आपण शुभेच्छा देतो.