बिबट्याच्या हल्ल्यामुळे वनविभागाची निष्क्रियता उघड
धुळे : तालुक्यातील मोघण, बोरकुंड, होरपाडा, मांडळ परिसरात नरभक्षक बिबट्याने हैदोस घातला आहे. बिबट्याचा वावर असल्याचे सांगूनही वनविभागाने दूर्लक्ष केले. त्यामुळे वनविभागाबद्दल ग्रामस्थ आणि शेतकर्यांमध्ये संताप आहे. त्यातून वनविभागाची निष्क्रीयता समोर आली आहे.
वनमंत्र्यांना भेटल्यांनतर धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी मुंबईहून थेट मोघण, बोरकुंड येथील घटनास्थळाला भेट दिली. आ. पाटील यांनी ग्रामस्थांची भेट घेत बिबट्याला जेरबंद करण्यात लवकरच यश मिळेल असे सांगत धीर दिला. मृत बालकांच्या कुटूंबियांना भेटून त्यांची विचारपूस करुन सात्वनही केले. दरम्यान, वनविभागाने यापुढे गांभीर्याने काम करीत वन्य प्राण्यांपासून जनतेचे व पाळीव जनावरांचे रक्षण करावे अशाही सूचना आ. पाटील यांनी दिल्या.
गेल्या तीन ते चार दिवसात धुळे तालुक्यातील नंदाळे आणि बोरकुंड येथील दोन बालकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तर एक जण गंभीररित्या जखमी आहे. बिबट्याचा बंदोबस्त व्हावा म्हणून आ. कुणाल पाटील यांनी 26 ऑक्टोबर रोजी वनमंत्री सुधिर मुंनगटींवार यांची मुंबईत मंत्रालयात भेट घेतली. या बिबट्याला जेरबंद करावे किंवा बेशुध्द करावे आणि तसे न झाल्यास ठार मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बिबट्याच्या शोधासाठी रेस्क्यू पथक दाखल झाले आहे. वनविभाग आणि रेस्क्यू पथकाचे सयुंक्त शोधकार्य सुरु आहे.
ग्रामस्थांची चर्चा व दिलासा : आ. कुणाल पाटील यांनी मोघण येथील शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा करीत त्यांना धीर दिला. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले. यावेळी येथील ग्रामस्थांनी वनविभागाच्या अकार्यक्षमतेवर संताप व्यक्त केला. अनेकवेळा तक्रारी करुनही वनविभागाच्या कर्मचार्यांनी दुर्लक्ष केल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. यावरुन वनविभागाची अकार्यक्षमता समोर आली आहे. यापुढे हलगर्जीपणा न करता ग्रामस्थांच्या तक्रारी गाभीर्याने घेत तत्काळ कार्यवाही करण्याचा सूचना आ. पाटील यांनी वन अधिकार्यांना दिल्या.
घटनास्थळी भेट : मोघण ता. धुळे शिवारातील धुडकू संपत माळी यांच्या शेतात बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली. या शेतात जाऊन आ. कुणाल पाटील यांनी वन अधिकारी व कर्मचार्यांसमवेत घटनास्थळाची पहाणी केली. चि. रमेश नानसिंग भादवे या बालकावर शेतात खेळत असताना बिबट्याने हल्ला केला व फरफटत ओढत नेले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. या सर्व घटनेची घटनास्थळी जावून आ. पाटील यांनी इत्यंभूत माहिती जाणून घेतली.
पिंजरे, सापळा आणि रेस्क्यू : आमदार कुणाल पाटील यांच्या मागणीवरुन वनविभाग खडबडून जागे झाले आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोघण, होरपाडा, बोरकुंड परिसरात वनविभागाने सुमारे 15 पिंजरे लावले आहेत. तर पुण्याहून 26 ऑक्टोंबर रोजी रात्री 2.30 वाजता रेस्क्यू पथक दाखल होवून त्यांनी तत्काळ सापळा लावला आहे. ड्रोन कॅमेराचा वापर करुन बिबट्याचा शोध घेतला जात आहे. लवकरच बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळेल, अशी खात्री रेस्क्यू पथकातील स्वयंसेवकांनी दिली आहे.
दिवसा वीज पुरवठ्याची मागणी : नरभक्षक बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकर्यांनी रात्रीचे शेतात जाणे बंद केले आहे. भारनियमनामुळे बोरकुंड, मोघण, मांडळ यासह बोरी पट्ट्यात शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी आ. कुणाल पाटील यांच्याकडे शेतकर्यांनी केली. त्यानुसार आ. कुणाल पाटील यांनी मोघण ता. धुळे येथूनच मोबाईलव्दारे अधिक्षक अभियंता, वीज वितरण कंपनी यांच्याशी संपर्क साधून शेतकर्यांच्या कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
ग्रामस्थांनी काळजी घ्यावी : आमदार कुणाल पाटील यांनी घटनास्थळी दाखल होवून ग्रामस्थांशी चर्चा करुन त्यांना धीर दिला. ग्रामस्थांनी स्वरक्षणासाठी रात्रीच्यावेळी घराबाहेर पडू नये तसेच अंगणात झोपू नये, तसेच गावातील तरुणांनी जागता पहारा देवून आपले व गावाचे रक्षण करावे, असे आवाहन केले. मी तुमच्या प्रत्येक संकटात खंबीरपणे उभा असून कोणीही धीर सोडू नये असेही आ. कुणाल पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आ. कुणाल पाटील यांच्यासोबत वनविभागाचे विभागीय वन अधिकारी राजेंद्र सरगर, वनक्षेत्र अधिकारी भूषण वाघ, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, संचालक साहेबराव खैरनार, माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, पं. स. चे माजी सभापती भगवान गर्दे, तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, जि. प. सदस्य अरुण पाटील, संचालक ऋषीकेश ठाकरे, सरपंच नागेश देवरे, नरेंसिंग देवरे, पं. स. सदस्य दिलीप देसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, पप्पू भदाणे, भटू पाटील, तुकाराम माळी, देविदास माळी, भानुदास माळी, चंद्रकांत राजपूत, लोटन माळी, रविंद्र राजपूत, धोंडू मोरे, चंदू माळी आदी उपस्थित होते.
रुग्णालयात जखमीची भेट : बिबट्याच्या हल्ल्यात मोघण येथे चि. रमेश नानसिंग भादवे हा मुलगा जखमी झाला आहे. त्याची आ. कुणाल पाटील यांनी धुळे जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधिकार्यांकडून वैद्यकीय अहवालाची माहिती घेतली व उपचारात कोणतेही दुर्लक्ष न करता आवश्यक ते सर्व वैद्यकीय औषधोपचार करण्याच्या सूचना दिल्या.
हेही वाचा