ॲड महेंद्र भावसार यांना विजयी करण्यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारींनी कंबर कसली
धुळे : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी ॲड. महेंद्र भावसार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून, राष्ट्रवादी पक्षाच्या धुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करुन विजय खेचून आणण्याची ग्वाही बैठकीत दिली.
धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, राष्ट्रवादीचे युवाचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार, महिला अध्यक्ष जया साळुंखे यांच्या उपस्थितीत झाली.
राष्ट्रवादी पक्षाचे एकमेव अधिकृत उमेदवार म्हणून ॲड. महेंद्र भावसार यांना पक्षाने उमेदवारी दिली, ही आपल्यासाठी मोठी संधी आहे. प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खानदेशातील कायद्याचे सखोल अभ्यासक, शिक्षकांवरील अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढा देणारा उमेदवार दिला असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचून आपल्या उमेदवाराला कसे विजयी करता येईल यासाठी मेहनत घेणे गरजेचे आहे, असे आवाहन इर्शाद जहागिरदार यांनी केले.
प्रारंभी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांनी प्रस्ताविक केले. ॲड. महेंद्र भावसार यांचा संपूर्ण परिचय आणि शिक्षकांसाठी एक हक्काचा उमेदवार म्हणून परिचय दिला. उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आम्ही सर्व संपूर्ण मेहनतीने जिल्हाभरात सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचून राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ निश्चितच मेहनत घेऊ, असा विश्वास दिला. सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी कार्यकर्ते संपूर्ण जिल्हा पिंजून काढणार असल्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले.