उमेद अभियानामुळे ग्रामीण भागातील महिला बनली उद्योजक
शिरपूर (प्रतिनिधी) : महिला बचत गट म्हटलं की सामान्यत: डोळ्यांसमोर येतात ते घरगुती लोणचं, पापड, शेवया किंवा शिवणकामासारखे पारंपारिक कुटीर उद्योग. मात्र या पारंपारिक व्यवसायांची चौकट मोडून जिल्ह्यातील एका उद्योजक महिलेने थेट गणेश मूर्ती निर्मिती आणि कलाकुसर क्षेत्रात गरुड भरारी घेतली. विशेष म्हणजे अडचणींवर मात करून यंदाच्या गणेशोत्सवात त्यांनी आपल्या व्यवसायात सुमारे साडेचार लाख रुपयांपर्यंत उलाढाल केली.

शिरपूर तालुक्यातील विखरण बुद्रुक गावातील महिला उद्योजिका कविता पाटील यांनी उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (Umed-MSRLM) भक्कम पाठबळावर चक्क लाखोंची उलाढाल करत ग्रामीण भागातील महिलांसमोर एक नवा आदर्श वस्तूपाठ ठेवला. गाव-खेड्यातील एका छोट्याशा घरातून सुरू झालेला हा प्रवास आता जिल्हा परिषदेच्या खंबीर मदतीमुळे शहराच्या बाजारपेठेपर्यंत येऊन पोहोचला आहे. कविता पाटील या दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात शिरपूर येथे गणेश मूर्ती विक्रीसाठी स्वतःचा स्टॉल लावतात. त्यांच्या या व्यवसायातील सातत्य, चिकाटी आणि काहीतरी वेगळे करण्याचे धाडस पाहून उमेद अभियानाने त्यांना नेहमीप्रमाणे मोलाची साथ दिली. प्रभाग समन्वयक अश्विनी पाटोळे यांच्यासह जिल्हा आणि तालुका कक्षातील सर्व वरिष्ठांच्या योग्य मार्गदर्शनाखाली त्यांना विखरण प्रभागातील प्रगती महिला प्रभागसंघातून विशेष वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले.

कविता पाटील या ताईंना प्रभाग संघातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. उमेद अभियानाच्या मदतीने त्यांनी गणपती मूर्तीचा व्यवसाय यशस्वी करून दाखवला. महिलांनी केवळ पारंपारिक व्यवसायांपुरते मर्यादित न राहता आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारे मोठे उद्योग उभे करावेत. हाच उमेद अभियानाचा मुख्य उद्देश आहे. – अश्विनी पाटोळे, प्रभाग समन्वयक
उमेद अभियानाकडून मिळालेल्या या अर्थसाह्याच्या बळावर कविता पाटील यांनी विखरण गावातच ‘सुदर्शन आर्ट’ या नावाने एक मोठे आणि सुसज्ज वर्कशॉप सुरू केले. अर्थसहाय्य मिळाले आणि कामही सुरू झाले. परंतु दुर्दैवाने एका किरकोळ अपघातात कविताताईंच्या पतीच्या दोन्ही हातांना दुखापत झाली. याही परिस्थितीत त्यांनी हार न मानता मुर्त्यांची रंगरंगोटी आणि कलाकुसर करण्याचे काम सुरूच ठेवले. हातांना दुखापत झाली असताही कविताताई यांच्या पतीने त्यांना शक्य होईल तेवढे सहकार्य केले. मुलाने कलाकुसरच्या कामात हातभार लावला. समाजाने आखून दिलेल्या चौकटीबाहेर पडून सुरू केलेल्या या व्यवसायात कविता पाटील यांना त्यांच्या कुटुंबाचे भक्कम पाठबळ लाभले.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत शिरपूर तालुक्यात 14 प्रभागसंघ आहेत. त्यापैकी विखरण प्रभागातील प्रगती महिला प्रभागसंघात गटातील ताई कविता पाटील या गेल्या चार पाच वर्षांपासून गणपती मूर्ती विक्रीचा व्यवसाय लहान प्रमाणात करत होत्या. त्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य मागणीसाठी अर्ज केला होता. अभियानाच्या दिशानिर्देशानुसार त्यांना कर्ज मंजूर केले. त्यातून त्यांनी अनेक अडचणींवर मात करीत व्यवसाय यशस्वी केला. – रामचंद्र पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक
यंदाच्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने त्यांनी आधीपासूनच सुदर्शन आर्टच्या माध्यमातून अत्यंत आगळ्यावेगळ्या, विलोभनीय आणि आकर्षक गणेश मूर्ती साकारल्या होत्या. या मूर्ती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी शिरपूरच्या मुख्य आणि गजबजलेल्या चौकात स्टॉल लावला. या स्टॉलला शिरपूरसह इतर तालुक्यातील मंडळांनीही भरभरून प्रतिसाद दिला. गणेशोत्सवाच्या आधीपासूनच मूर्त्यांची बुकींग झाली होती
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शिरपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि करवंद नाका परिसरात प्रचंड पाणी साचले. दुकानांमध्येही पाणी शिरले. त्यामुळे कविताताई यांना अतिशय धावपळ करून मुर्त्या वाचवाव्या लागल्या. या नैसर्गिक आपत्तीचा देखील कविताताईंनी फार धैर्याने आणि संयमाने सामना केला. बुकिंग केलेल्या मुर्त्या तर त्यांनी दिल्याच पण परिस्थितीच गांभीर्य ओळखून उरलेल्या मुर्त्या देखील त्यांनी कमी जास्त भावात विक्री करीत उत्तम व्यावसाय केला.
अनेक समस्या आणि अडचणींवर मात करत कविताताईंनी व्यवसायात यश संपादन केलं आणि महिलांपुढे आदर्श निर्माण केला. कविताताई यांच्या या यशाची प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली. त्यामुळे त्यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे समाजातील इतरही महिलांना नेहमीच प्रेरणा मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान अंतर्गत राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येते. गरीबी निर्मूलनासाठी ग्रामीण भागातील महिलांच्या संस्था उभारून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने अभियान सुरू आहे.

महिलांनी केवळ एका उपजीविकेवर अवलंबून न राहता एकापेक्षा अधिक उपजीविका निर्माण करून उत्पन्नाचे स्रोत वाढवावेत यासाठी उमेद अभियान काम करत आहे. धुळे जिल्ह्यात सर्व गावांमध्ये महिला स्वयंसहाय्यता समुह स्थापन झाले आहेत. महिलांना विविध उद्योग व्यवसायांचे प्रशिक्षण देवून अर्थसहाय्य उपलब्ध करण्यात येते. या माध्यमातून महिलांनी व्यवसाय सुरू केले आहेत. अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला ‘लखपती दिदी’ होत आहेत. त्यातीलच एक कविता पाटील या ताई यशस्वी उद्योजक झाल्या. त्यांच्या व्यवसायाला अभियानाकडून आम्ही शुभेच्छा देतो. प्रभाग समन्वयक तसेच तालुका टिमचे काम कौतुकास्पद आहे. – लोकेश सोनवणे, जिल्हा अभियान व्यवस्थापक













