The wife killed the wife with the help of her boyfriend प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, तरडी शिवारातील खुनाचा असा लावला पोलिसांनी तपास
#Dhule Crime धुळे: शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारातील खुनाचा पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांत तपास लावला आहे.
पोटच्या मुलीकडे वाईट नजरेने पाहत असल्याच्या संशयातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पहिल्या पतीची हत्या केल्याचा प्रकार शिरपूर तालुक्यातील तरडी येथे घडला होता. कुठेही सबळ पुरावे नसताना पोलिसांनी योग्य दिशेने तपास करुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या खुनात मृत तरुणाच्या पत्नीसह चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
विशेषतः कोणताही पुरावा नसताना मयताच्या खिशातील बसच्या एका तिकिटावरून धुळ्याच्या पोलीस पथकाचा तपास मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील आरोपीपर्यंत जाऊन पोहोचला. यातून मयताच्या पत्नीसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारात गोविंद हिरालाल परदेशी यांच्या मक्याच्या शेतामध्ये अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचे हात ओढणीच्या साहाय्याने बांधण्यात आले होते. त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याची बाब प्राथमिक तपासात उघड झाली.
घटनास्थळावर मारेकऱ्यांनी कोणताही पुरावा ठेवला नव्हता. मात्र, मृत तरुणाच्या खिशामध्ये असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एका तिकिटाच्या मदतीने पोलीस तपास थेट मध्य प्रदेश आणि मग गुजरात राज्यातील पोरबंदर गावापर्यंत जाऊन पोहोचला. मृतदेह सापडल्यानंतर थाळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अन्साराम आगरकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांच्या पथकाने सुरू केला. मृत तरुणाच्या अंगठ्याजवळ मुकेश नाव असल्याचे दिसून आले. मात्र, त्या पुढील अक्षरे मृतदेह खराब झाल्यामुळे वाचणे अवघड होते. त्यातच मृतदेहाच्या खिशात असलेल्या तिकिटावरून तो चोपडा येथून शिरपूरपर्यंत आल्याचे निदर्शनास आले.
तिकिटावर असलेली तारीख पाहता सीसीटीव्ही फुटेज शोधण्यात आले. या फुटेजमध्ये तरुणाबरोबर एक महिला देखील बसमध्ये बसल्याचे निदर्शनास आले यावरूनच या गुन्ह्याची उकल झाली. मृत तरुण मध्य प्रदेशातील सेंधवा तालुक्यातील चाचऱ्या येथे राहणारा मुकेश राजाराम बारेला असल्याचे समोर आले. पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी मुकेश बारेला याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे.
चौकशीतून सुशील उर्फ मुसल्या जयराम पावरा, दिनेश उर्फ गोल्या वसुदेव कोळी आणि जितू उर्फ तुंगऱ्या लकडे पावरा या तिघांचा खून प्रकरणी संबंध असल्याची बाब निदर्शनास आली. संबंधित आरोपींना गुजरात राज्यातील पोरबंदर येथून पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.