Municipal Corporation Shame-Shame… Water is flowing drop by drop…
महापालिका शेम-शेम… पाणी पाजे थेंब-थेंब…
Dhule News धुळे : शहराचा पाणीप्रश्न अतीशय बिकट झाला आहे. ऐन उन्हाळ्यात दहा ते १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने धुळेकरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे मंगळवारी शिवसेनेपाठोपाठ समाजवादी पक्षानेही आंदोलन करीत प्रशासनाला धारेवर धरले. ‘महापालिका शेम-शेम… पाणी पाजे थेंब-थेंब…’, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
समाजवादी पार्टीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात पाणी वितरणाबाबत मनपा प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार सुरू आहे. दहा ते पंधरा दिवस पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांचा संताप अनावर होण्यापूर्वीच उपाययोजना करा, अशी मागणी समाजवादी पार्टीतर्फे करण्यात आली.
पाणी वितरनासंदर्भात मनपा प्रशासनाची उदासीनता व निष्काळजीपणाच्या धोरणाबाबत अनेकवेळा निवेदने देण्यात आली. परंतु पाणी वितरणात दिवसेंदिवस ढिसाळ कारभार होत आहे. पाणी नियोजनाबाबत फक्त कागदावरच अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका दाखवून धुळेकरांची दिशाभूल करण्यात येत आहे. कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. मनपा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ, नियोजनशून्य आणि बेजबाबदारपणामुळे श कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना पाण्यासाठी भर उन्हात भटकंती करावी लागत आहे.
पाणी व्यवस्थापन व वितरणावर कोट्यवधींचा निधी खर्च दाखवून धुळेकरांना पाणी मिळत नाही. तात्काळ उपायोजना करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी गुड्डू काकर, जमील मन्सूरी, अकील अन्सारी, डॉ. सरफराज अन्सारी, इमरान शेख, नेहाल अन्सारी, आरिफ मंसूरी, रफिक शाह, नवाब खान, गुलाम कुरेशी, अलीमोदीन शेख, हाजी खुर्शीद, नवाब खान, अजहर अली, अतिक अन्सारी, रशीद शेख, रफिक शाह, नाजीम शेख, आलमगीर शेख, नवीद अन्सारी उपस्थित होते.