धुळे(Dhule): येथील मील परिसरातील चितोड रोडलगतच्या तुळसाबाई मळ्यातील रहिवाशांनी प्रजासत्ताक दिनी (republic day) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामुहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला.
गेली 35 ते 40 वर्षे वास्तव्य असलेली अतिक्रमित घरे नियमानुकुल करुन घरांना हक्काचा सातबारा मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. धुळे जिल्हाधिकारी, तसेच महानगरपालिका आयुक्त व भूमि अभिलेख कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता., मात्र प्रशासनाने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने या नागरिकांनी प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण झाल्यानंतर मिल परिसरातील नागरिकांनी घोषणाबाजी करत स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवले व त्यांच्याकडील डिझेलच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. मात्र काही आंदोलकांनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, सर्व आंदोलकांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.













