पाच लाखांची लाच स्वीकारताना विशेष लेखापरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
धुळे : येथील विशेष लेखा परीक्षक तथा सावदा येथील महालक्ष्मी पतसंस्थेचा प्रशासक सखाराम ठाकरे याला पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. गुरुवारी मध्यरात्रीनंतर धुळे बस स्थानकाजवळ ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील सावदा नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलात असलेल्या पतसंस्थेच्या गाळ्याचा ताबा देण्यासाठी तसेच सुरक्षा अनामत रक्कम वर्ग करण्यासाठी त्याने तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच मागितली होती.
सावदा ता. रावेर येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था अवसायनात गेली आहे. विशेष लेखा परीक्षक सखाराम ठाकरे हा या पतसंस्थेचा प्रशासक आहे. या पतसंस्थेचे कार्यालय सावदा नगरपरिषदेच्या राजे छत्रपती संभाजी व्यापारी संकुलातील गाळा क्रमांक एकमध्ये आहे. या व्यापारी गाळ्यासाठी पतसंस्थेचे तत्कालीन प्रशासक अशोक बागल यांनी तक्रारदारांकडून ३ लाख ८५ हजार रुपये सुरक्षा अनामत रक्कम रोख घेतली होती. परंतु पावती मात्र दिली नाही. तसे प्रतिज्ञापत्र लिहून दिले आणि व्यापारी गाळा तक्रारदाराला दिला. हे काम करताना तत्कालीन प्रशासक अशोक बागल यांनी तक्रारदाराकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. परंतु तक्रारदाराने मागणीची पूर्तता न केल्याने संस्थेची अनामत रक्कम तक्रारदाराच्या नावे वर्ग केली नाही.
दरम्यान, अशोक बागल यांची बदली झाली आणि या संस्थेवर धुळ्यातील सहकारी संस्थांचे विशेष लेखा परीक्षक सखाराम ठाकरे यांची नेमणूक झाली. तक्रारदाराने संस्थेच्या गाळ्याची सुरक्षा अनामत रक्कम नगरपरिषदेच्या दफ्तरी नाव लावून वर्ग करून देण्याची मागणी ठाकरे यांच्याकडे केली. ठाकरे यांनी तक्रारदाराकडे यासाठी पाच लाख रुपये लाचेची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दिली. धुळ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करत सापळा रचला. १७ ऑगस्ट रोजी धुळे मध्यवर्ती बस स्थानकात सखाराम ठाकरे हा ५ लाख रुपयाची लाच घेत असताना त्याला एसीबीच्या पथकाने बेड्या ठोकल्या.
ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय हेमंत बेंडाळे, पीआय रूपाली खांडवी, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.