वि. दा. सावरकर स्मारक सुशोभीकरणाच्या कामाला महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या खोडा
धुळे : देवपूरातील बॅरिस्टर वि. दा. सावरकर स्मारक चौक सुशोभीकरणाच्या कामात महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने खोडा घातल्याचा आरोप एमआयएम पक्षाने केला आहे. एमआयएमच्या महिला आघाडीने सोमवारी पालिका प्रशासनाला निवेदन दिले.
सावरकर स्मारक परिसर सुशोभिकरण कामासाठी आमदार फारुख शाह यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून २० लाख रूपयांचा निधी दिला आहे. त्यानुसार अंदाजपत्रकासह सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या होत्या. जिल्हाधिकारी यांच्या २९ मे २०२३ रोजीच्या पत्रानुसार प्रस्ताव सादर करणे अपेक्षित होते. मात्र अद्यापपर्यंत सदर प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. मनपा सत्ताधारींच्या दबावाखाली सदर काम थांबविण्यात आल्याचे निदर्शनास येते.
सावरकर स्मारक परिसर सुशोभिकरण करण्याच्या प्रस्तावास तत्काळ मंजुरी देवून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी मागणी एमआयएम पक्ष महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. दीपश्री नाईक, नगरसेविका नाजीया पठाण, नगरसेविका हीना पठाण, ॲड. प्रिती त्रिवेदी, रेखा कुळकर्णी, भाग्यश्री बैसाणे, भारती येवले यांनी आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.